पुणे, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
ग्राहकांच्या समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी पुणे परिमंडलात आयाेजित ग्राहक समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांत 1293 ग्राहक सहभागी झाले असून, 744 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 684 अर्जांचा निपटारा करण्यात आला. 60 प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. पुणे परिमंडलातील उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या साेमवारी हे शिबिर आयाेजिले जाते. वीजबिल, वीजपुरवठा, मीटर, वीजजाेडणी; तसेच महावितरणच्या विविध सेवांशी संबंधित तक्रारी थेट अधिकारी, कर्मचाऱ्यांसमाेर मांडण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. गणेशखिंड शहर मंडलात 33 ठिकाणी 553 ग्राहक सहभागी झाले. तेथे 282 अर्ज प्राप्त झाले असून, 271 अर्जांचा निपटारा करण्यात आला.
रास्ता पेठ शहर मंडलात 67 ठिकाणी 480 ग्राहक सहभागी झाले. प्राप्त 291 अर्जांपैकी 257 अर्ज निकाली काढण्यात आले. पुणे ग्रामीण मंडलातील 15 ठिकाणी 260 ग्राहक उपस्थित राहिले असून, 171 अर्जांपैकी 156 अर्जांचा निपटारा करण्यात आला. पुणे परिमंडलातील सर्व 52 उपविभागीय कार्यालयांत 21 सप्टेंबरला पुढील ग्राहक समाधान शिबिर हाेईल. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हाेणाऱ्या या शिबिराचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.