मुंबई, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्राे-13 मिरा-भाईंदर ते वसई-विरार या प्रकल्पास; तसेच पुणे शहरातील वाहतूक काेंडी सुटण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगराेडच्या साेरतापवाडी ते वरवे शिवरे मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, उद्याेग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयु्नत डाॅ. संजय मुखर्जी आदी उपस्थित हाेते.
मिरा-भाईंदर ते वसई- विरार मेट्राे-13 मार्ग नायगाव, नालासाेपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकाशी जाेडणार असून, मेट्राे मार्ग क्रमांक 9 साेबत नेताजी सुभाषचंद्र बाेस स्टेडियम येथे जाेडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचेही नियाेजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मान्यतेनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. या मार्गासाठी येत्या सहा महिन्यांत भूसंपादन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुणे शहरातील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित पुणे रिंगराेडच्या पूर्व विस्तारीकरण प्रकल्पाच्या 10502.36 काेटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. रस्ते विकास महामंडळामार्फत या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 80 ट्नके भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन आहे.