मुंबई, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डाॅक्टरांची येत्या काही दिवसांत नियु्नती करण्यात येणार आहे. आणखी 600 डाॅक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आराेग्य सेवेसाठी उपलब्ध हाेतील, अशी माहिती आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आराेग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आराेग्य विभागाची महिला आराेग्य समिती, जन आराेग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने जन आराेग्य संवाद साधला. आराेग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आराेग्यविषयक समस्या जाणून घेत त्या साेडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आराेग्य समित्यांच्या बैठका नियमित हाेतात का, डाॅक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डाॅक्टरांचा रुग्णांशी याेग्य संवाद हाेताे का आणि रुग्णालयांत आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती या संवादात घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययाेजना करण्यावर भर दिला जाणार आहे. आराेग्य व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आराेग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफाॅर्म तयार करण्याची सूचना केली. तसेच शासकीय दवाखान्यांत अनुपस्थित राहणाऱ्या डाॅक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा, असेही त्यांनी सूचवले. या सूचनांना आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.