राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ग्रंथ संग्रहालयाला भेट

    20-Aug-2026
Total Views |

rajyapal 
मुंबई, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ऐतिहासिक एशियाटिक साेसायटीच्या ग्रंथ संग्रहालयाला भेट देऊन ग्रंथसंपदा, दुर्मिळ दस्तावेज, साेपारा येथील अवशेष, नकाशे व दुर्मिळ नाण्यांची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी एशियाटिक साेसायटीला ग्रंथ जतन व संवर्धन कार्यासाठी 20 लाखांची देणगी जाहीर केली. एशियाटिक साेसायटीला भेट देऊन अतिशय आनंद झाला, असे सांगून येथील ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांना सुपूर्द करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांकडे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. नव्या पिढीला येथे कसे आकर्षित करता येईल, या दृष्टीने चिंतन झाले पाहिजे. एशियाटिक ही सजीव व गतिमान संस्था व्हावी, असेही त्यांनी सांगितले. त्रिपुरा राज्य व तेथील राजघराण्यांसंबंधी ‘राजरत्नाकरम’ या संस्कृत ग्रंथाबद्दल त्रिपुरात पुष्कळ चर्चा हाेते. प्रत्यक्षात ताे ग्रंथ तेथे कुणीच पाहिलेला नाही. ताे ग्रंथ आज प्रथमच आपण एशियाटिक ग्रंथालयात पाहिला याचा खूप अभिमान वाटताे, असे राज्यपालांनी सांगितले. ग्रंथाची प्रत आपणास भेट देऊ, असे डाॅ. विनय सहस्रबुद्धे यांनी राज्यपालांना सांगितले. डाॅ. सहस्रबुद्धे यांनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली; तसेच नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समितीच्या व छाननी समितीच्या सदस्यांची ओळख करून दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डाॅ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू व उपाध्यक्ष डाॅ. संजय देशमुख, पदाधिकारी विवेक गणपुले, राजेश बेहरे, सुरेंद्र कुलकर्णी, माधव भंडारी आदी उपस्थित हाेते.