मुले पालकांची मालमत्ता नाहीत; जोडीदार निवडण्याचा त्यांना अधिकार

हेबिअस कॉर्पस याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

    20-Aug-2026
Total Views |

partner 
मुंबई, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
सज्ञान मुले पालकांची मालमत्ता नसतात, जर सज्ञान मुलगी स्वतःच्या इच्छेने जाेडीदार निवडत असेल, तर तिचा ताबा मिळवण्यासाठी ‘हेबिअस काॅर्पस’ याचिका दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
 
नागपूरची एक 17 वर्षीय मुलगी शिकवणीसाठी म्हणून घरातून निघून गेली; पण परत आली नाही. सीसीटीव्ही तपासल्यावर ती एका मुलासाेबत बाहेर जाताना दिसली. पाेलिसांनी मुलीचा शाेध घेतला आणि तिचा ताबा तिच्या पालकांना दिला; पण मुलगी पुन्हा घरातून निघून गेली. त्यानंतर पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
 
उच्च न्यायालयाने आईची याचिका फेटाळली. न्यायालयाने संबंधित मुलीचे उत्तर नाेंदवून घेतले, ज्यात तिने म्हटले की, ती स्वतःच्या मर्जीने आईला साेडून त्या मुलासाेबत गेली.
तिने उच्च न्यायालयाला सांगितले की, तिला त्या मुलासाेबत राहायचे आहे.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने नमूद केले की, ती किशाेरवयीन मुलगी आता सज्ञान असल्याने, तिला आपला जीवनसाथी निवडण्याचा हक्क आहे. मुलगी अल्पवयीन असताना मुलाने तिला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले हाेते, हा आईचा दावा न्यायालयाने फेटाळला. आईने असाही आराेप केला की, मुलाविरुद्ध पाॅक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा; पण तसे करता आला नाही.
 
उच्च न्यायालयाने, सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत म्हटले की, मुलांच्या ताब्याच्या बाबतीत, त्यांचे हित सर्वाेपरी असते. ते पालकांच्या हक्कांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
हेबियस काॅर्पस याचिका स्वीकारण्यासाठी बेकायदेशीर ताबा सिद्ध करणे आवश्यक आहे. या प्रकरणात ते सिद्ध झाले नाही, त्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.