मुंबई, 1 ऑगस्ट (आ.प्र.) :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी विमानतळावरील एअर कार्गाे काॅम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएडीसीच्या संचालक मंडळाची 93 वी बैठक मंत्रालयात झाली.
बैठकीस एमएडीसीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्रा, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, आयु्नत विपिन इटनकर; तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
पुरंदर विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीत एमएडीसीसाेबत सिडकाे, एमआयडीसी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) सहभाग असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हडकाेमार्फत 6 हजार काेटींच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देत सर्व कामे नियाेजित वेळेत पूर्ण करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एमएडीसीमार्फत नांदेड, नाशिक, जळगाव, काेल्हापूर, सिंधुदुर्ग, गाेंदिया आणि अमरावती या सात विमानतळांचा विकास करण्यात येत असून, रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 64 काेटींची तरतूद करण्यात आली असून, लातूर विमानतळासाठी 38 काेटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कराड विमानतळाच्या 1700 मीटर धावपट्टीच्या विस्ताराची कार्यवाही सुरू असून, भविष्यात येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करण्याचे नियाेजन आहे. तसेच, चंद्रपूरच्या फ्लाईंग क्लब, तसेच धाराशिव आणि यवतमाळ येथील विमानतळ करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.