नागपूरचे कन्व्हेन्शन सेंटर जागतिक दर्जाचे करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश : २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

    02-Aug-2026
Total Views |

nagpur 
मुंबई, 1 ऑगस्ट (आ.प्र.) :
नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन व व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्याेगांना आणि राेजगार निर्मितीला माेठी चालना देणारा ठरणार असून, 2029 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियाेजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात नागपूर कन्व्हेन्शन सेंटरसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, नागपूरचे आयुक्त डाॅ. विपीन इटनकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलाेना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेराे उपस्थित हाेते.
 
नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियाेजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूरमध्ये माेठ्या क्षमतेच्या कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता असून, या केंद्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन, काॅर्पाे रेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम आयाेजित करता येणार आहेत. हे कन्व्हेन्शन सेंटर नागपूरच्या ओळखीचे सांस्कृतिक केंद्र ठरावे. यासाठी वास्तुरचना आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी.
आधुनिक वास्तुशैलीसाेबतच ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
या प्रकल्पाच्या माध्यमातून हाॅस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्यटन, तसेच संबंधित सेवा क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ घडवणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे. नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद, प्रदर्शन, पर्यटन आणि उद्याेग केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया, निविदा, जमीन हस्तांतर, बांधकाम आणि इतर आवश्यक कामे कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्प नियाेजित वेळेत कार्यान्वित करण्याचे नियाेजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.