ऐन सणासुदीत चहा, बिस्कीट, तेल, पीठ, तांदूळ, मसाले महागणार

कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत

    14-Aug-2026
Total Views |
 
fmcg
मुंबई, 13 ऑगस्ट (आ.प्र.) :
श्रावण महिन्यापासून भारतात सणसमारंभांना सुरुवात हाेते. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांवर महागाईचा बाेजा पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराण युद्ध आणि आखाती देशांतील वाढत्या तणावामुळं कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्या सप्टेंबर तिमाहीत उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. एफएमसीजी कंपन्यांनी दर वाढवल्यास ऐन सणासुदीमध्ये राेजच्या वापराच्या चहा, बिस्कीट, तेल, साबण, पीठ, तांदूळ, मसाले, टूथपेस्ट इत्यादी वस्तूमहाग हाेण्याची शक्यता आहे. एफएमसीजी कंपन्यांनी एप्रिल-जून तिमाहीत सरासरी 2 ते 5 टक्के दरवाढ केली, तर जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये किमती स्थिर ठेवल्या.
 
मात्र पॅकेटमधील वस्तूचे वजन कमी केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार हाेत आहे. पाम तेल, साखर, कच्च्या तेलाच्या अस्थिर किमतीमुळे कंपन्याच्या मार्जिनवर परिणाम हाेत आहे. त्याचबराेबर मान्सून आणि अल निनाेसारख्या हवामानासंबंधित परिस्थितीताही परिणाम हाेत असल्याचं समाेर आलं आहे.
 
बेकरी उत्पादने बनवणारी देशातील प्रमुख कंपनी ब्रिटानियाने देखील साखर आणि पाम तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने 5 आणि 10 रुपये किंमत असलेल्या बिस्कीट पुड्याचे वजन कमी केले आहे. आधी 10 बिस्किटे मिळत हाेती, तर त्याऐवजी 8 बिस्किटे मिळतील.
गाेदरेज कंझ्युमर प्राॅडक्ट्स लिमिटेड चालू तिमाहीतही किमती वाढवू शकते. तथापि, जाेपर्यंत वस्तूंच्या किमतींचा कल स्पष्ट हाेत नाही, ताेपर्यंत कंपनीला काेणताही माेठा निर्णय घ्यायचा नाही.
 
कंपनीचे सीईओ सुधीर सीतापती म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरतेमुळे कंपनीने आतापर्यंत माेठी दरवाढ टाळली आहे. ते म्हणाले की, जून तिमाहीप्रमाणेच कंपनीला सप्टेंबर तिमाहीतही किमती वाढवाव्या लागू शकतात. सीतापती म्हणाले की, अनेक कच्च्या मालाच्या किमती कच्च्या तेलाशी निगडित आहेत आणि त्या 3-4 आठवड्यांच्या विलंबाने बदलतात. सध्या ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 80-85 डाॅलरच्या दरम्यान असल्याने, काेणतीही माेठी अतिरिक्त दरवाढ आवश्यक असेल असे कंपनीला वाटत नाही.
 
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड सप्टेंबर तिमाहीत विविध उत्पादन श्रेणींमध्ये दरवाढ करण्याची शक्यता आहे. एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत महागाई 2 ते 5 टक्क्यांनी वाढू शकते. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सीईओ आणि एमडी, प्रिया नायर यांनी सांगितले की, जून तिमाहीत 2 ते 5 ट्न्नयांनी दरवाढ केल्यानंतर, विक्रीच्या प्रमाणावर आधारित वाढीवर परिणाम न करता वाढता खर्च भरून काढण्यासाठी कंपनी चालू तिमाहीत आवश्यकतेनुसार संतुलित दरवाढ लागू करेल. डाबरदेखील आपली उत्पादने अधिक महाग करणार आहे. डाबर इंडियाने म्हटले आहे की, नजीकच्या भविष्यात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती कायम राहण्याची शक्यता आहे.