काेल्हापूर, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
पाेलंडच्या संसद सदस्या आणि पाेलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पाेलिश शिष्टमंडळाने काेल्हापूरला सदिच्छा भेट दिली. ही भेट केवळ दाेन देशांमधील राजकीय संबंधांपुरती मर्यादित नव्हती, तर दाेन संस्कृतींमधील अतुट आपुलकी आणि कृतज्ञतेचा उत्सव, असे त्याचे स्वरूप हाेते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काेल्हापूरच्या भूमीने आणि तत्कालीन छत्रपतींनी परागंदा पाेलिश बांधवांना हक्काचे घर दिले. पाेलिश शिष्टमंडळाने याच ऐतिहासिक आठवणींना भावूक हाेत उजाळा दिला. आमच्या पूर्वजांना या मातीने संकटकाळात पाेरके हाेऊ दिले नाही. याच भूमीने सुमारे पाच हजार पाेलिश पुरुष, महिला आणि बालकांना आश्रय दिला. आमच्या श्रद्धा, परंपरा आणि रीतीरिवाज आम्ही येथे जपले. आमच्या मुलांना शिक्षणाचा प्रकाश मिळाला आणि या मातीतच अशा काही सुंदर आठवणी निर्माण झाल्या, ज्या पिढ्यानपिढ्या आमच्या हृदयात कायम टिकून राहतील, अशा शब्दांत शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. काेल्हापूरच्या आतिथ्याने आणि येथील संस्कृतीने पाेलिश शिष्टमंडळाचे मन जिंकले.
पाेलंड आणि भारताच्या सामायिक इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आल्याची भावना पाेलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी व्यक्त केली. यावेळी युवराज संभाजीराजे, महापाैर रूपाराणी निकम, महापालिकेचे आयु्नत डाॅ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जॅस्मिन, संयाेगिताराजे छत्रपती, पाेलंडचे मुंबईतील वाणिज्य दूत ताेमास्क विएलगाेमास, नवी दिल्लीतील पाेलिश इन्स्टिट्यूटच्या संचालक व मंत्री मालगाेझावेयसिस उपस्थित हाेते. पाेलिश शिष्टमंडळाने वळीवडे येथे उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयास त्यांच्या संग्रहातील तत्कालीन अनेक ऐतिहासिक वस्तू व छायाचित्रे प्रदान केली. अपेक्षा निरंजन या वळीवडे येथे वास्तव्यास असलेल्या पाेलिश कुटुंबाच्या वंशजांनी मनाेगत व्य्नत केल.