श्री दासबोध नित्यपाठ

नरदेही आलियां येक। काही करावे सार्थक ।।२।।

    12-Aug-2026
Total Views |
 
RamdasSwami
आत्मनिवेदन म्हणजे परमेश्वराशी एकरूप हाेणे; जीवा शिवाची एकात्मता हाेणे, तू आहेस मी नाही, अशी स्थिती प्राप्त हाेणे हाेय. या अवस्थेत पाेचल्यानंतर भक्त वेगळेपणाने उरतच नाही.
 
ताे स्वत:च भगवंत हाेऊन जाताे. संत कबीरांचा एक प्रसिद्ध दाेहा आहे. त्यात ते म्हणतात की, मी तुला म्हणजे भगवंताला शाेधण्यासाठी भक्ती करीत राहिलाे आणि जेव्हा तू मला प्राप्त झालास तेव्हा माझ्यातला ‘‘मी’’च नाहीसा झाला. शाेधणाऱ्याला भगवंत मिळाला आणि शाेधणाराच त्या भगवंतात विलीन झाला. त्याचे वेगळेपण संपून गेले. ही भक्तीची परमावस्था आहे.
 
ती साध्य करणे हे आपण आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले पाहिजे. त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी संतसंगती अति अपूर्व काम करणारी आहे.
त्याबराेबरच याेग्य मार्गाने मिळालेली संपत्ती हे देवाचे देणे आहे असे समजून ताे पैसा व आपले अंत:करण श्नय तेवढे सन्मार्गाला लावावे, असेही श्रीसमर्थ बजावतात.
 
या मार्गाने जर तुम्ही गेला नाहीत, तर मनुष्यजन्माला येऊनही तुमचे आयुष्य व्यर्थ, निर्फळ गेले असे हाेईल. अशी वागणारी माणसे भूमीला भारभूत असतात आणि त्यांनी आपल्या मातेचे कष्टही वाया घालवले असे हाेते. तेव्हा प्रत्येकाने सन्मार्गाने ऐहिक जीवनात वागावेच; पण केवळ तेच सर्वस्व न मानता, संतसंग, नवविधा भक्ती करून पारलाैकिक लाभ करून घ्यावा व आपल्या साधनेने आत्मस्थिती जाणून घेऊन भगवंताशी एकरूप व्हावे, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊन माेक्ष साधावा व नरदेह मिळाल्याचे सार्थक करावे असेच त्यांचे पुन:पुन्हा सांगणे आहे.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299