ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अलंकापुरीत विसावला

संतश्रेष्ठ माऊली-तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी

    11-Aug-2026
Total Views |
 
mauli
आळंदी, 10 ऑगस्ट (आ.प्र.) :
टाळ-मृदंगांचा निनाद...माऊली-तुकारामांचा अखंड जयघाेष...विविध वाद्यांचा गजर...रांगाेळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी साेहळा हजाराे वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. 32 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘श्रीं’ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डाेळे पाणावले हाेते.
 
माऊलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी परंपरेनुसार चाेपदारांकडून सर्व सुख गाेडी साही शास्त्रे निवडी... या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माऊलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामाेरे जाऊन पालखीचे स्वागत केले. तेथे माऊलींची आरती करण्यात आली.
 
त्यानंतर नगरपालिका चाैक-श्रीविष्णू मंदिर-श्रीराम मंदिरहरीहरेंद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर वीणा मंडपात पालखी विसावली.
 
पालखीतील ‘श्रीं’च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमाेर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची आरती करण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानातर्फे ‘श्रीं’ना पिठलं-भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्या वतीने पिठलं-भाकरीचा प्रसाद वाटून या मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली. माऊलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी भर पावसात स्थानिक नागरिक, शहरातील विद्यार्थी व भाविकांनी थाेरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी माेठी गर्दी केली हाेती.