काेल्हापूर, 10 ऑगस्ट (आ.प्र.) :
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार रुग्णालयातील (सीपीआर) विविध नूतनीकरण, आधुनिकीकरण कामांचे लाेकार्पण; तसेच पाेलीस गृहसंकुल कामांचे लाेकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालक मंत्री प्रकाश आबिटकर, सहपालक मंत्री माधुरी मिसाळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित हाेते. रुग्णालयाच्या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन करत रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामे करण्यात आली असून, त्यासाठी 600 काेटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी सीपीआर रुग्णालयाच्या ऐतिहासिक वाटचालीसह नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांवर आधारित लघुपट दाखवण्यात आला; तसेच रुग्णालयाची प्रतिमा मान्यवरांना भेट देण्यात आली.
या नूतनीकरणात रुग्णालयाची मुख्य प्रवेशद्वार कमान, माॅड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, माॅड्युलर आयसीयू, एमआरआय विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड; तसेच विविध वैद्यकीय विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. रुग्णालयातील विविध इमारतींची दुरुस्ती, रस्ते व परिसर विकास, विद्युत व्यवस्था, फर्निचर, विविध विभागांचे बांधकाम व ट्राॅमा केअर सेंटर, अत्याधुनिक ऑपरेशन सुविधा तसेच विविध पायाभूत कामे करण्यात आली आहेत.