गोंदवलेकर महाराज

भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा

    11-Aug-2026
Total Views |
 
GondavlekarMaharaj
भगवंतापाशी मागणे मागताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा, दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागणे मागताना चूक हाेऊ नये.
 
एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले, परीक्षेच्या वेळी परीक्षक काेणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे ते सांगून, त्यांची उत्तरेही सांगून ठेवली; पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात, तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देताे आहे हे जरी त्याला दिसले, तरी तिथे त्याला काही बाेलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, तेव्हा त्या वेळी चुकीने काही भलतेच मागू नका, एवढ्याचकरिता हा इशारा आहे.
 
काेणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्यावाईट गाेष्टींचा परिणाम मनावर कमी हाेताे. मनुष्यावर संकटे आली की, ताे घाबरताे; परंतु परमेश्वराचे अस्तित्त्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे याेग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डाेक्यावर पांघरूण घेऊन बागुलबुवा केला, तर ते मूल भिते; पण पांघरूणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही.
 
त्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्यावाईट गाेष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने हाेतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती वा दु:ख वाटणार नाही, तसेच चांगल्या गाेष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही हाेणार नाही.
आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याचे सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट हाेऊनही मागाहून तसे न झाल्याचेच बरे वाटते. म्हणजे काेणत्याही गाेष्टीचे सुखदु:ख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दु:ख मानू या.
याकरिता सदासर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे.
 
कर्ज िफटताना जसा आपल्याला आनंद हाेताे तसा देहभाेग भाेगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लाेकांचे कर्ज बुडविणेच हाेय. आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि त्या प्रारब्धाचा नाश बराेबर हाेताे.
 
‘भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दु:खाचा दाेष तुझ्याकडे नाही. जर दु:खामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल, तर मला जन्मभर दु:खामध्येच ठेव, असे कुंतीने भगवंताजवळ मागितले, यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा.