नवी दिल्ली, 9 ऑगस्ट (वि.प्र.) :
उच्च पदवी असलेल्या भारतीयांसह, एइ-2 श्रेणीचा व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना आता आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. अमेरिकन सरकारने जाहीर केले आहे की, यावर्षी या श्रेणीचे व्हिसा उपलब्ध हाेणार नाहीत. अमेरिकेप्रमाणेच कॅनडानेही काही व्हिसा श्रेणींसाठीचे नियम अधिक कडक केले आहेत, ज्यामुळे हजाराे भारतीयांना कॅनेडियन व्हिसा मिळवणे कठीण झाले आहे.
अमेरिकन सरकारच्या म्हणण्यानुसार, यावर्षी नाेकरी-आधारित ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी एइ-2 श्रेणीमध्ये जागा नाही, त्यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून नवीन जागा उपलब्ध हाेईपर्यंत या श्रेणीमध्ये अर्ज करणे शक्य हाेणार नाही. एइ-2 श्रेणीमध्ये विशेष पात्रता असलेल्या परदेशी नागरिकांना थेट प्रवेश मिळताे.
उच्च शिक्षणानंतर तज्ज्ञ म्हणून अमेरिकेत जाण्यासाठी भारतीयांमध्ये ही व्हिसा श्रेणी खूप लाेकप्रिय आहे.
अमेरिकी सरकारने म्हटले हाेते की, अर्जदारांकडून जास्त मागणी असल्यामुळे या वर्षीच्या जागा भरल्या आहेत आणि त्यामुळे भारतीयांसाठी व्हिसाची ही श्रेणी उपलब्ध नाही.
आता, पुढील आर्थिक वर्षापासून नवीन जागा उपलब्ध झाल्यावर अर्ज करता येतील.
अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवत, कॅनडामध्येही भारतीयांसाठी व्हिसाचे नियम अधिक कठाेर झाले आहेत. कॅनेडियन इमिग्रेशन विभागाच्या मते, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आधारावर जारी केल्या जाणाऱ्या व्हिसासाठीची पात्रता बदलण्यात आली आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांच्या पत्रांच्या आधारे वर्क परमिट मिळत असे; परंतु आता त्या श्रेणीमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कॅनेडियन सरकारने ठरवलेले निकष देखील पूर्ण करावे लागतील. व्हिसाची ही श्रेणी भारतीयांमध्ये खूप लाेकप्रिय हाेती. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना कॅनडाला जाण्यासाठी या प्रकारचा व्हिसा मिळत असे, परंतु आता नवीन नियमांमुळे भारतीय व्यावसायिकांना फटका बसेल.