नागरी सहकारी बँकिंगला 'अंब्रेला'मुळे नवसंजीवनी

सहकार नव-क्रांती मेळाव्यात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

    10-Aug-2026
Total Views |

HM 
मुंबई, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकांचे जाळे विस्तारण्याला माेठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी व्य्नत केला. देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, अशी घाेषणा केली.
 
येथे आयाेजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात शाह बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, पणनमंत्री जयकुमार रावल, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्याेतिंद्र मेहता, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डाॅ.
आशीष कुमार भूटानी, तसेच नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
 
महाराष्ट्रात 449 सहकारी बँका असून, देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे माेठे याेगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गाेवा आणि कर्नाटक या राज्यांत देशातील माेठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल.
 
देशातील शहरी सहकारी बँकांना अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी सांगितले. शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटरचे अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे माजी उपमहाव्यवस्थापक जी. पी.
 
मिस्त्री यांनी लिहिलेल्या ‘ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन काे-ऑपरेटिव्ह बँक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरीत्या जाेडल्या गेलेल्या प्रथम सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत ‘काेअर बँकिंग सर्व्हिस’ आणि संबंधित सेवांचे लाेकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल फाॅरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि एनयूसीएफडीसी यांच्यात या वेळी सामंजस्य करार करण्यात आला.