भारतीय ज्ञानपरंपरा व तंत्रज्ञानाचा संगम चडवणारे शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारू

मुख्यमंत्र्यांचा विश्वास : संस्कृत विद्यापीठासाठी जमीन सुपूर्द

    10-Aug-2026
Total Views |
 
nashik
मुंबई, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जाेड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या 16.80 हेक्टर (सुमारे 41.51 एकर) जमिनीचा 7/12 उतारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. या वेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी.
 
मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिकमध्ये अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 400 काेटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, ताे केंद्राच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विषयातील बी. टेक. अभ्यासक्रमासह विविध आधुनिक व पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या परिसरात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे 1500 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे.