साेलापूर, 30 जुलै (आ.प्र.) :
साेलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आता गावपातळीवरच माेफत, सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या आराेग्य सुविधा मिळणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात (एनक्यूएएस) साेलापूर जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आराेग्य मंदिरांनी राष्ट्रीय दर्जा पटकावला आहे.
जिल्हा परिषदेला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकेच्या आराेग्य संस्थांमधून निवड झाली नसताना जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाने ही कामगिरी केली आहे.
रुग्णकेंद्रित सेवा, स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रभावी व्यवस्थापन या निकषांवर हे मानांकन दिले जाते. या मूल्यांकनात दक्षिण साेलापूर तालुक्यातील बाेरामणी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणारे मुस्ती (84.31 टक्के), तसेच माेहाेळ तालुक्यातील पाटकुल केंद्रांतर्गत येवती (83.73 टक्के) आणि अंकाेली केंद्रांतर्गत औंधी (82 टक्के) या आयुष्मान आराेग्य मंदिरांनी यश मिळवले आहे.
या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावर संसर्गमुक्त उपचार, औषधे व उपकरणांचे याेग्य व्यवस्थापन आणि रुग्ण समाधानात वाढ हाेईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत विशेष प्राेत्साहन निधी मिळणार आहे. या निधीतून आराेग्य केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील.
यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी गावातच विश्वासार्ह सुविधांचा लाभ घेता येईल.
पालकमंत्री जयकुमार गाेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व आराेग्य सभापती चैतन्यसिंह केदार सावंत यांच्या
नियंत्रणाखाली जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सतीश काेपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. नंदकिशाेर घाडगे, सहायक संचालक डाॅ. माेहन शेगर, जिल्हा माता-बाल संगाेपन अधिकारी डाॅ. हर्षल जाधव यांच्यासह तालुका आराेग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आराेग्य अधिकारी, आराेग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.