मसल मास म्हणजेच सशक्त स्नायूंची गाेष्ट केली तर लाेकांसमाेर थेट बाॅलिवूडच्या हिराेचे बाहूच येतात किंवा एखाद्या अॅथलीटचे शरीर. सशक्त स्नायूंचा अर्थ केवळ बाहेरून सुंदर दिसणारे स्नायू असा नसताे. स्नायू भरदार असणे वेगळे आणि सशक्त असणे यामध्येही फरक आहे. ते सशक्त बनवण्यासाठी लाेक जिमला जात असतात.
अनेक लाेक असे आहेत ज्यांना जिमच्या नावाचाच राग येताे कारण त्यांना त्या प्रकारचा व्यायाम आवडत नाही किंवा असेही असू शकते की जिम्मची महागडी मेंबरशिप प्रत्येक व्यक्तीला परवडणारीही नसते. मग काय करावे? तसे पाहिल्यास स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रत्येक व्यक्तीने केलेच पाहिजे, पण ती सुरुवात कशी करावी हे लाेकांना समजत नाही. सुरुवात नेहमी हळूहळू करावी. फॅन्सी जिमला जाऊनच सुरुवात हाेऊ शकते असे नाही. घरीही तुम्ही ती सुरुवात करू शकता.
\
वेट-ट्रेनिंगला विशेष असा काेणताही पर्याय नाही. सूर्य नमस्कार, धावणे, पुश-अप्स, प्लँक इत्यादी व्यायाम असे आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराच्या वजनाचाच वापर तुमचे स्नायू सशक्त बनवण्यासाठी करता.
ज्याने आयुष्यात कधीही वेट-ट्रेनिंग केली नाही अशा काेणत्याही व्यक्तीने आधी या प्रकारच्या व्यायामाने सुरुवात केली पाहिजे आणि नंतर हळूहळू ती वेट-ट्रेनिंग चालू करू शकते.
वेट-ट्रेनिंगमध्येही तुमचे बाहू दिसलेच पाहिजेत असे नाही. तुम्हाला लीन बाॅडीच ठेवायची असेल तर वजन कमी उचलावे परंतु रिपीटेशन जास्त करावेत. जसे की हाताचा व्यायाम करत असाल तर दाेन्ही हातांवर क्षमतेनुसार 2-5-10 किलाे वजनाने सुरुवात करू शकता. जास्त वजनाने 10 वेळा रिपीट केल्या जाणाऱ्या व्यायामापेक्षा कमी वजनासह ताेच व्यायाम 20 वेळा करा जेणेकरून रिझल्ट मिळेल आणि स्नायू फुगलेले वाटणार नाहीत.
पूर्वीचे लाेक दरराेज खूप मेहनत करत, स्त्रिया घराची इतकी कामे करत की स्वयंपाकघरातील कामे आणि घरकामामध्ये त्यांचे स्नायू सशक्त बनत असत. पुरुषही खूप भार उचलत असत. आज आपण अधिकाधिक बैठे जीवन जगताे. ज्या लाेकांना वेट- ट्रेनिंग करायची नाही त्यांनी काेणत्याही प्रकारचा व्यायाम एक तासासाठी नक्कीच केला पाहिजे.
केवळ चालायला जाणे पुरेसे नाही.
प्रत्येक व्यायामामध्ये मग ताे याेग असाे वा पिलेट्स, झुम्बा असाे वा एराेबिक्स, तुमच्या शरीराचा भार तर तुम्हालाच उचलायचा आहे. याशिवाय जीवनशैलीत थाेडा बदल घडवून आणा. दरराेजच्या भाज्या आणि फळे किंवा किराणा स्वतः उचलून आणा. घरची आणि बाहेरील कामे जितकी शक्य असतील तितकी स्वतःच करा. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणे महत्त्वाचे आहे.