नवी दिल्ली, 30 जुलै (आ.प्र.) :
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास याेजनेंतर्गत 335 काेटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस केंद्राने नुकतीच मंजुरी दिली. राष्ट्रीय कृषी विकास याेजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास याेजनेच्या आढावा बैठकीत याबाबतची घाेषणा केली. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्रीय कृषी सचिव, तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले हाेते. बैठकीत राज्यातील विविध कृषी याेजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास याेजनेंतर्गत महाराष्ट्राने 75 ट्न्नयांहून अधिक निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल चाैहान यांनी राज्याचे विशेष काैतुक केले.
तसेच, मिशन फाॅर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हाॅर्टिकल्चर याेजनेत 81.73 टक्के निधी खर्च झाल्याने महाराष्ट्र देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्राने 335 काेटींच्या निधीस मंजुरी दिली असून, यास राज्य शासनाचा 40 टक्के पूरक हिस्सा 223 काेटी मिळून एकूण 558 काेटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आराेग्य व्यवस्थापन, तसेच राष्ट्रीय कृषी विकास याेजनेंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.