ज्ञानेश्वरी

    31-Jul-2026
Total Views |
 

Dyaneshwar
तरी हेचि प्रकृति किरीटी। मी स्वकीया सहजें अधिष्टीं।
तेथ तंतुसमवाय पटीं। जेविं विणावणी दिसेŸ।। 9.106
आपण भूतांची निर्मिती कशी करताे हे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत.
ज्ञानाचा अनुभव घेऊन चराचर सृष्टीकडे पाहिले की सर्वत्र मीच आहे असा अनुभव येईल. सर्वत्र सच्चिदानंदरूप ब्रह्मच आहे असा बाेध तुला हाेईल. अर्जुना, नीट ध्यानात घे की, ही जड व नाशवान भूतसृष्टी माझी माया किंवा प्रकृती निर्माण करीत असते.
ग्रीष्म ॠतूत ज्याप्रमाणे गवत वाळून बीजरूप हाेते आणि ते जमिनीत लीन हाेते, वर्षाॠतूत ढग जमतात, त्याप्रमाणे कल्पाच्या आरंभी मीच ही सर्व सृष्टी निर्माण करताे. अशी समजूत असली तरी याविषयी खरा विचार पुढीलप्रमाणे आहे. अर्जुना, मी या प्रकृतीला सहज जवळ केली आणि तंतूंनी युक्त असलेल वस्त्राच्या ठिकाणी वीण जशी दिसून येते, तशी या व्यक्त जगाची जडणघडण ध्यानात येते. लहान-लहान चाैकड्यांनी जसे वस्त्र भरले जाते तशी पंचमहाभूतांच्या आधाराने ही सृष्टी निर्माण हाेते.
 विरजण लावले की दूधच आटून जसे दही हाेते, त्याप्रमाणे प्रकृतीच सृष्टीच्या रूपाने परिणाम पावते. जमिनीत पेरलेल्या बीजाला पाण्याचा अंश लाभला की त्याचा विस्तार हाेताे, त्याप्रमाणे मी या भूतसृष्टीच्या निर्मितीला कारण आहे. अर्जुना, राजाने सहज शहर वसविले असे आपण म्हणताे.
 पण ते खरेच राजा उभे करताे काय? त्याप्रमाणे भूतसृष्टीचे निर्मितिस्थान मी असलाे तरी त्या भूतसृष्टीशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही. समुद्राला भरती आली तरी चंद्राला कष्ट पडतात का? त्याप्रमाणे सृष्टी निर्माण झाली तरी मी अविकृतच असताे.