गोंदवलेकर महाराज

    30-Jul-2026
Total Views |
saint 
 
 
प्रपंचीं राहून समाधान।हेंच मोठें ज्ञानाचे ज्ञान।भगवंतानें काय दिलें तेंपाहावें। त्यांत समाधानराखावें ।। भगवंताचा हातजेथें। समाधानसुखराहातें तेथें ।। राम ठेवीलत्यांत समाधान राखावें ।हाच सुखी होण्याचा मार्ग जाण ।। रामापायी अनन्य झाला। समाधान चालत येई घराला ।। ज्याचे अंतःकरणांत समाधान। तेथें भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण ।।आपलें असमाधान होण्याचें कारण। रामाहन दुसऱ्याचे झालों आपण ।। उपाधिरहित रामास पाहावें। मध्यंतरी चित्त कोठें न गुंतवावें ।। चित्त गुंतता मध्यस्थळीं । परमात्म्याची प्राप्ती दुरावली ।। भगवंताचें स्मरण। तसेंच भगवंताचें आगमन । पुण्याईशिवाय घडत नाही जाण ।। श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास । समाधान राखावें खास ।। दाता एक रघुनंदन। हा भाव ठेवावा मनांत। त्यास दैन्यपण न येईल जगांत ।। धर्माचे रक्षण। ठेवतां परमात्म्याचें स्मरण ।।राम आपल्या दासावरी। नित्य कृपा करी ।। राम परमात्मा कृपा करतो । सर्व चुकीची क्षमा करतो ।। पुन्हा वाईट न वागावें। याबद्दल जबाबदारीनें वर्तावें ।। अंतीं घेतां माझें स्मरण। मी उद्धरीन त्यास आपण। हैं खुद्द भगवंताचें वचन । तेथे नसावें शंकेचें कारण ।। रघुनाथावाचून सुखी झाला। असा नाहीं कोणीं पाहिला, ऐकिला ।। मीपणाचा सोडावा अभिमान। तोच एक भगवंताचा झाला जाण ।। राजाची झाली भेट। खालच्यांचें नाहीं महत्त्व तेथे। तैसें जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ।। आजवर रामानें सांभाळ केला। तो आजहि नाहीं निजलेला। पण त्याची जागृती। असे आमचे हातीं ।। काळावर ज्याची सत्ता। त्याचे चरणीं ठेवावा माथा। मग धोका नाही ही मानावी सत्यता ।। राम ज्याच्या हृदयीं करी वास। तेथे ऋद्धिसिद्धि पडल्या ओस ।। निःस्वार्थापार्शी भगवंत। हा जाणावा सिद्धांत ।। राम कर्ता हा ठेवावा भाव। कमीपणाला नाहीं ठाव ।। कर्तव्य करावें निःस्वार्थबुद्धीनें। राम खूष होईल त्यानें ।। ज्याला नाहीं दुसरा उपाय। तेथे मागावें भगवंताचे साहाय्य ।। परमात्मा ज्याचा साह्यकारी। त्यास धोका नाहीं तिळभरी ।। ज्यास नाहीं मोबदला जाण। त्याला एकच भगवंत प्रमाण ।। दीनदयाळू परमात्मा राम खास। न ठाव द्यावा विकल्पास ।। त्याच्याशीं वागावें सत्य। कृपा करील भगवंत ।। रामाचा उत्सव व्हावा आनंदात । सर्वांना गर्क करावें रामनामांत ।। उत्सवांत न दुजे करणें कांहीं। रामच सत्य हैं प्रत्यया येई ।। उत्सव तोच साजरा झाला। रामच सत्य सत्य वाटला भला ।। विषयाविरहित मारावी हांक। तुमचे समोर माझा दाशरथी राम ।। देह आहे परतंत्र। मन राखावें भगवंताशीं स्वतंत्र ।। रामाने करावे सर्वांचें कल्याण । दुष्टास सुबुद्धि देऊन जाण ।। भगवताचें देणे। हैं त्याचे इच्छेने घडणे ।। अखंड करा नामस्मरण। जेणें कृपा करील रघुनंदन ।।