उत्तम लक्षणांचे वर्णन श्रीसमर्थांनी त्यांची आराधना करावी या हेतूनेच केलेले आहे. कोणत्याही सद्गुणाची, कौशल्याची प्राप्ती सहजासहजी आणि विनासायास होत नसते. त्यासाठी कष्टपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. या प्रयत्नांची सुरुवात म्हणजे आधी त्या गुणांचे महत्त्व आपल्याला मनापासून पटले पाहिजे. ते पटल्यानंतर मगच मनापासून तो गुण अंगी बाणवण्याची साधना सुरू होऊ शकेल. जगामध्ये विनासायास आणि फुकटची कोणतीच वस्तू मिळत नाही. मग उत्तम गुण म्हणजे तर बहुमोल वस्तू आहे. ती फुकाफुकी कशी मिळेल? तिच्या प्राप्तीच्या प्रयत्नांचा प्रारंभ प्रत्येकाने करावा यासाठीच श्रीसमर्थ या सदगुणांचे महत्त्व आपल्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांना चारचौघांत आपले विचार मांडण्याचा सभाधीटपणा नसतो. आपण स्पष्टपणे बोलल्याशिवाय आपले विचार दुसऱ्यास कळणारही नाहीत, मग ते त्याला पटण्याचे दूरच ! म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात की असा बुजरेपणा सोडून सभाधीटपणा आणावा व सभेमध्ये स्पष्ट बोलण्यास कधीही लाजू नये. लोकसंग्रहावर त्यांचा भर आहे आणि लोकसंग्रहासाठी प्रभावी वक्तृत्व हे महत्त्वाचे साधन त्यांनी मानलेले आहे. मात्र त्याचबरोबर बाष्कळपणे बोलू नये हेही बजावून ते पुढे म्हणतात की पैज लावू नये, परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये.