पंढरपूर, 26 जुलै (आ.प्र.) : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भ्नतांची गर्दी पाहता त्यांना उत्तम साेयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर काॅरिडाॅरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काेणावरही अन्याय न करता सर्वांचे याेग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलरुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक; तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माने व प्रभावती माने या दांपत्यासमवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी पालक मंत्री जयकुमार गाेरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित हाेते. शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने (मु. पाे. गाैरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) या दांपत्याचा मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला; तसेच एसटीकडून त्यांना वर्षभर माेफत एसटी प्रवास पास देण्यात आला.
पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिकमु्नत वारी, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर प्रबाेधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (काैंडण्यपूर), द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान (जालना) आणि तृतीय क्रमांक गाेऱ्हेकर संस्था (आळंदी देवाची) यांना पुरस्कार व धनादेश देण्यात आला. औसेकर महाराजांनी सर्वांचे स्वागत करून विठ्ठल मंदिर समिती संवर्धनाच्या कामाची माहिती दिली तसेच याबाबत शासनाचे आभार मानले.