महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था आता अधिक सक्षम हाेणार

    27-Jul-2026
Total Views |

1Trillion Economy 
 
मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला गती देण्यासाठी राज्य शासनाचा थेट परकीय गुंतवणूक, अनिवासी भारतीय व राजशिष्टाचार विभाग आणि जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन (जेसीएएफ) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराच्या माध्यमातून राज्यात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, भांडवल उभारणीला चालना देणे, ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे; तसेच जागतिक गुंतवणूकदारांशी संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध हाेणार आहे. या भागीदारीमुळे राज्यातील उद्याेग, पायाभूत सुविधा आणि विविध विकास क्षेत्रांत गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण हाेण्यास मदत हाेणार आहे.
 
या करारानुसार जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन आपल्या जागतिक संस्थात्मक, काॅर्पाेरेट, अनिवासी भारतीय, आर्थिक व शैक्षणिक नेटवर्कच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रांत परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणार आहे; तसेच, जागतिक गुंतवणूकदारांना देशातील कररचना, फेमा, कंपनी कायदे आणि अन्य कायदेशीर बाबींविषयी तांत्रिक मार्गदर्शन व सल्लागार सेवा उपलब्ध करून देणार आहे. याबराेबरच राज्य शासन आणि जेसीएएफच्या विद्यमाने देशांतर्गत; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदार गाेलमेज परिषदा, कार्यशाळा आणि जागतिक गुंतवणूकदार मेळाव्यांचे आयाेजन करण्यात येणार आहे.
 
या सामंजस्य करारावर राज्य शासनातर्फे थेट परकीय गुंतवणूक, अनिवासी भारतीय व राजशिष्टाचार विभागाचे सचिव डाॅ. राजेश गवांदे आणि जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशनतर्फे अध्यक्ष (अ‍ॅपेक्स) सीए शांतिलाल काेचर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपसचिव क्रांती पाटील, अवर सचिव अविनाश साेलवट, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव व धाेरणात्मक सल्लागार डाॅ. संताेष भाेसले; तसेच जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित हाेते.