ऐसे अत्तम गुण। जेणे बाणे खूण। सर्वज्ञपणाची ।।२।।

    25-Jul-2026
Total Views |
saint 
वक्ता बाेलत असताना मध्येच त्याला ताेडू नये आणि आपण स्वत: एखादी गाेष्ट केल्याशिवायच तिचा डांगाेरा पिटू नये. अति राग व्यर्थ आहे आणि ताेंडाळ व वाचाळ माणसाशी भांडत बसणेही तितकेच व्यर्थ आहे.
 
पाेटात कपट न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे, अति वादविवाद टाळले पाहिजेत आणि कुल आणि शील यांची चाैकशी केल्याशिवाय लग्न करू नये.
 
इतका तपशीलवार उपदेश श्रीसमर्थांसारखा हनुमंताचा नि:सीम भक्त असलेला ब्रह्मचारी करत असलेला पाहून मन आदराने भरून येते. शहाण्या माणसाने पूर्ण विचार केल्याशिवाय बाेलणे आणि सर्व परिणाम लक्षात घेतल्याशिवाय कृती करणे टाळावे आणि सर्व प्रापंचिक व्यवहार करताना देह, देश, काल आणि परिस्थिती यांच्या मर्यादा आधी जाणून घ्याव्यात, असे त्यांचे सांगणे आहे.
 
दिलेले वचन कदापिही विसरू नये, हा एकवचनी रामाचा आदर्श अंगी बाणावा असे सांगणारे श्रीसमर्थ त्यांच्या राेखठाेक स्वभावाप्रमाणे आणखीही एक महत्त्वाचा उपदेश करतात की, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपले सामर्थ्य आणि पराक्रम अगत्य दाखवून दुष्ट प्रवृत्तीच्या दुर्जनांना अवश्य धडा शिकविलाच पाहिजे.
 
यातील ‘‘अगत्य’’ शब्द महत्त्वाचा आणि समर्थ शिकवणुकीचे सार समजला पाहिजे! आणि आपण भारतीयांनी लाेकशाही व गणतंत्र यांच्या रक्षणार्थ ही वृत्ती जाेपासलीच पाहिजे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299