नवी मुंबईत वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र कार्यपद्धती

    25-Jul-2026
Total Views |
 
Navi Mumbai
 
नवी मुंबई, 24 जुलै (आ.प्र.) : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईत माेठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. या घटनांनंतर महापालिकेने त्यामागील कारणांचा शास्त्रीय अभ्यास हाती घेतला. त्यात झाडे पडण्यास केवळ अतिवृष्टी कारणीभूत नसून, वाढते काँक्रीटीकरण, मुळांचे हाेणारे नुकसान, अशास्त्रीय छाटणी, अयाेग्य वृक्षप्रजातींची निवड आणि शहरी विकासातील काही त्रुटी तेवढ्याच जबाबदार असल्याचे वृक्षतज्ज्ञांनी स्पष्ट केले. या निष्कर्षांच्या आधारे झाडांची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
 
पालिका आयु्नत डाॅ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत उद्यान विभागाच्या उपायु्नत स्मिता काळे यांच्यासह वृक्षतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर, डाॅ. चंद्रकांत साळुंखे, शर्वरी बर्वे, सारंग फळे आणि वृक्ष विशेषज्ज्ञ (अर्बाे रिस्ट) वैभव राजे यांनी भाग घेतला. जुलैत काेसळलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययाेजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
 
तज्ज्ञांच्या मते, शहरातील रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील सिमेंट काँक्रीटमुळे झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळत नाही.
 
त्यातच केबल, जलवाहिन्या आणि इतर भूमिगत सुविधांसाठी हाेणाऱ्या खाेदकामामुळे मुळे कापली जातात. त्यामुळे झाडांची जमिनीवरील पकड कमकुवत हाेऊन वादळी पावसात ती उन्मळून पडतात. रस्त्यालगत आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील 90 टक्क्यांहून अधिक झाडे याच कारणांमुळे पडतात, तर गावठाण आणि झाेपडपट्टी भागात काँक्रीटीकरण कमी असल्याने तेथे झाडे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
 
पहिल्या पावसानंतर पानांवर पाणी साचल्याने झाडांचे वजन वाढते. त्याचवेळी मुळांभाेवती पाणी साचून माती सैल हाेते. किनारपट्टीवरील शहर असल्याने नवी मुंबईत भूजल पातळी उंच असून, त्यामुळे झाडांची पकड आणखी कमकुवत हाेण्याची शक्यता वाढते. वृक्षप्रजातींची निवडही महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या सूचनांनुसार याबाबत आता नवी कार्यपद्धती अंगिकराली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.