मुंबई, २४ जुलै (आ.प्र.) : भारतात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या क्यूडीईएनजीए लशीला बाजारात वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही लस ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी व्यक्तीला याआधी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही याची तपासणी करण्याज गरज राहणार नाही. भारतात उत्पादन होत असल्यामुळे याचा पुरवठा जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल. भारतात मिळालेल्या मंजुरी ताकेडाच्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. याअंतर्गत फेज १, फेजर आणि फेज ३ चे एकूण १९ क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आले आहेत. ज्यात २८ हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला. क्यूडेंगा (टीएके-००३) ही जपानी कंपनी ताकेडाने शोधलेली लस आहे, परंतु, मेक इन इंडियांतर्गत या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देशातच होईल. यासाठी ताकेडाने हैदराबादमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी बायोलॉजिकल ईसोबत करार केला आहे. ताकोडा कंपनीच्या आंतरखंडीय बाजारपेठ विभागाचे प्रमुख महेंद्र नायक यांनी सांगितले की, २०२२मध्ये लाँच झाल्यापासून क्यूडेन्गा लशीला आत्तापर्यंत ४३ देशांमध्ये मंजुरी मिळाली असून जगभरात ३.२ कोटींपेक्षा जास्त डोस वितरित करण्यात आले आहेत. सात वर्षांच्या वैद्यकीय आकडेवारीनुसार ही लस डेंग्यू संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून दीर्घकाळ संरक्षण देते. जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांत या लशीच्या वापराची शिफारस केली आहे.
तसंच, डब्यूएचओकडून प्रिक्वाॅलिफिकेशन मिळाल्यामुळं युनिसेफ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे लशीचा खरेदी व पुरवठा सुलभ हाेणार आहे.
मुंबईत पावसाळी आजारांचा धाेका वाढला असून, यंदा 1 जानेवारी ते 14 जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टाेस्पायराेसिसच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आराेग्य विभागाने दिली. अनेक भागांत साचलेल्या दूषित पाण्यामुळे विशेषतः लेप्टाेस्पायराेसिसचा संसर्ग हाेण्याचा धाेका वाढल्याने नागरिकांनी पाण्यातून चालणे टाळावे, आवश्यक असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषधे (प्राेफिलॅक्सिस) घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दूषित पाणी साचले आहे. अशा पाण्यातून चालल्याने लेप्टाेस्पायराेसिसचा संसर्ग हाेण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बाधित भागातील नागरिकांनी आवश्यक असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषध (प्राेफिलॅक्सिस) घ्यावे. डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने विशेष बांधकाम तपासणी माेहीम सुरू केली आहे.