वारीत लाखाे वारकऱ्यांना आराेग्यसेवा; दगडूशेठ गणपती ट्रस्टचा पुढाकार

    25-Jul-2026
Total Views |
 
DagdushethGanpati
 
पुणे, 24 जुलै (आ.प्र.) : ज्ञानाेबा माऊली, तुकाराम...च्या गजरात कित्येक मैल पायी प्रवास करत विठ्ठल रखुमाईच्या भेटीच्या ओढीने जाणाऱ्या लाखाे वारकऱ्यांची आराेग्यसेवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. आषाढी वारीत संपूर्ण पायी प्रवासात; तसेच प्रत्येक मु्नकामाच्या ठिकाणी आराेग्यसेवा, माेफत औषध वाटप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती.
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत साेपानकाकांच्या पालखी साेहळ्यासाेबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तीन सुसज्ज रुग्णवाहिका श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पालख्यांसाेबत पुण्यातून रवाना झाल्या हाेत्या. याशिवाय वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले हाेते.
 
जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असून, माेठ्या प्रमाणात डाॅक्टर, औषधे व आराेग्यविषयक सेवा पालखी साेहळा समाराेपापर्यंत विनामूल्य पुरवण्यात येत आहेत.
 
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियाेजन करणारे डाॅ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ट्रस्टचे वैद्यकीय विभागप्रमुख राजेंद्र परदेशी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाताे. उपक्रमाचे यंदा 37वे वर्ष आहे.
 
वारकऱ्यांच्या आराेग्याची काळजी घेत आवश्यक आराेग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयाेजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी साेहळ्यात सासवड, जेजुरी, वाल्हे, लाेणंद, फलटण, तरडगाव, माळशिरस, वाखरी येथे, संत तुकाराम महाराजांच्या पालखी साेहळ्यात लाेणी काळभाेर, यवत, बारामती, बेलवाडी, इंदापूर, अकलूज, वाखरी येथे आणि संत साेपानकाका पालखी साेहळ्यात साेमेश्वरनगर, बारामती, लासुर्णे, अकलूज, भंडी शेगांव, वाखरी आदी ठिकाणी आराेग्यसेवा देण्यात आल्याचे डाॅ.परांजपे यांनी सांगितले.