भांडुप पक्षी उद्यानासाठी 45 काेटी रुपयांचा निधी : पालक मंत्री शेलार यांची माहिती

    25-Jul-2026
Total Views |
 
BhandupBirdPark
 
मुंबई, 24 जुलै (आ.प्र.) : भांडुपच्या पक्षी उद्यानासाठी जिल्हा नियाेजन निधीतून 45 काेटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास शेलार यांनी व्य्नत केला.
 
शेलार यांनी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. रामसर स्थळ म्हणून घाेषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगाे अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून, भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे 20.09 हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी केवळ 0.35 हेक्टर क्षेत्रात पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या परिसरात कांदळवन परिसंस्था, दलदलीचे अधिवास, खारफुटी क्षेत्रे, तसेच स्थानिक व स्थलांतरित सुमारे 250 विविध जातींच्या पक्ष्यांचे माेठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. प्रकल्पात पक्षीनिरीक्षण केंद्रे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा, हरित क्षेत्र विकास, नैसर्गिक अधिवास संवर्धन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणीय समताेल राखण्यास, जैवविविधतेला चालना मिळण्यास, पर्यटन विकासास गती मिळण्यास, तसेच स्थानिक नागरिकांसाठी विरंगुळा व पर्यावरण शिक्षणाचे प्रभावी केंद्र उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.