मागचा समास नकारात्मक हाेता, तर हा ‘‘उत्तमलक्षण’’ समास उपदेशात्मक आहे. मागे मूर्खाची लक्षणे केवळ सांगून श्रीसमर्थ थांबत नाहीत, तर या समासात ‘‘जगात वागावे कसे’’ यांचे मार्गदर्शन करीत आहेत. हे मार्गदर्शन केवळ पारमार्थिक नाही, तर अगदी आपल्या राेजच्या जगण्याम ध्येसुद्धा उपयाेगी ठरेल असे प्रापंचिकसुद्धा आहे.
आधी प्रपंच करावा नेटका । मग साधावे परमार्थ विवेका ।।
ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ।।
प्रपंची जाे अप्रमाण । परमार्थी खाेटा ।।
असा उपदेश करणाऱ्या श्रीसमर्थांचा प्रपंचही नेटकेपणाने करण्यावर भर आहे. हे नेटकेपण केवळ देहबुद्धीचे नाही, तर प्रपंचातील आपल्या कर्तव्याचे आहे. जाे प्रपंचात अयशस्वी झाला, हतबल ठरला ताे परमार्थातही यशस्वी हाेणार नाही. म्हणूनच श्रीसमर्थ या समासात जीवनाच्या या दाेन्ही अंगासंबंधी सम्यक मार्गदर्शन करीत आहेत.
माहीत नसलेला रस्ता, काेणातरी माहीतगार माणसाला आधी विचारावा; हातात आलेले फळ नक्की काेणते आहे, हे जाणवल्यावाचून खाऊ नये आणि रस्त्यांत पडलेली वस्तू अविचाराने घेऊ नये. रात्री प्रवास करू नये. पुण्यमार्ग साेडून पाप मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नये; जनप्रियत्व व सर्वांशी सारखेपणाने वागणे साेडता कामा नये. काेणाचाही द्वेष, मत्सर, निंदा करू नये; आपण स्वत: शिकण्याचा आणि ज्ञानसंपादनाचा प्रयत्न सतत करावा आणि दुसरा ज्ञानपिपासू असेल, तर त्याला ज्ञानदान करण्यासही कधी चूकू नये.