काेल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

    24-Jul-2026
Total Views |
 
Kolhapur Cricket
 
मुंबई, 23 जुलै (आ.प्र.) : काेल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत काेल्हापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशन आणि क्रीडा विभागादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध हाेणार आहेत. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, काेल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियाेजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, काेल्हापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, काेल्हापूरचे जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड, क्रीडा विभागाचे उप सचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर माेरे, तसेच जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पाटणकर व पदाधिकारी उपस्थित हाेते. जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पाेर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तेथे बाॅक्सिंग, ज्यूदाे, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच, क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून, स्थानिकांना राेजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध हाेणार आहेत.