नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल

    24-Jul-2026
Total Views |

saint 
नामात प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा. मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पाेटात धस्स हाेते, अन्न गाेड लागत नाही, झाेप लागत नाही.अशा अनेक गाेष्टी हाेतात.
 
थाेडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न हाेते. नाम घेण्यात थाेडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी हाेते का? याचे उत्तर आपल्याला स्वत:कडूनच मिळण्यासारखे आहे. नाम घेणे हा माझा धर्म आहे, ते माझे आद्य कर्तव्य आहे, त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखे आहे, नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे, किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलाे आणि तद्रूपच हाेऊन जाईन, इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे. आणि मग प्रेम आले नाही ही गाेष्ट शक्यच नाही. प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने, ते जसे येईल तसे घेत राहणे.
तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल. ‘परिस्थिति चांगली आली म्हणजे नाम घेईन’ असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.
 
नाम हें मनात किंवा उच्चार करूनही घेता येते. नामात राहावे, म्हणजे अंत:करणाची शुद्धता हाेईल आणि अंत:करण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल. नुसत्या पुष्कळ जपापेक्षा, विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे. खरे म्हटले म्हणजे नामांतच नामाचे प्रेम आहे. ताकात लाेणी असतेच, फक्त ते वर दिसत नाही. पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते, तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपाेआप वर येते. साध्या शब्दांचादेखील आपल्या वृत्तीवर परिणाम हाेऊन ताे ताे भाव आपल्या मनात जागृत हाेताे. मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही? आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळताे तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा.
 
पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना? प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपाेआप येईल. उठता बसता, चालता बाेलता, आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुट्टी आली म्हणजे जसे आठ दिवस आपण गावी जाताे, त्याचप्रमाणे आपण घरी राहूनच काही दिवस अभ्यास करावा.
 
काेणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते, आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या अधीन जाताे. अूचे पहा! दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे. काेणतीही चांगली गाेष्ट साधायला कठीण असणारच; पण अगदी थाेड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेतले असावे.
साध्या शब्दांचासुद्धा आधार माेठा असताे. मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा माेठा असेल!