इअरबड्स वापरणे धाेक्याचे ठरू शकते मुंबई, 23 जुलै (आ.प्र.) : कानातील मळाला वैद्यकीय भाषेत सेरुमेन असे म्हणतात. हा कानाच्या नलिकेतील ग्रंथींमधून नैसर्गिकरित्या तयार हाेताे. अनेकजण कानातील मळ दिसताच ताे अस्वच्छ असल्याचे समजून कापसाच्या काडीने (काॅटन बड्स), इअरबड्स किंवा इतर टाेकदार वस्तूंचा वापर करून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही सवय धाेकादायक ठरू शकते. कानातील मळ हा कानाच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. ताे धूळ, घाण, जंतू आणि अगदी लहान कीटकही कानाच्या पडद्यापर्यंत पाेहाेचण्यापासून राेखताे. याशिवाय ताे कानाच्या आतील त्वचेला ओलावा देताे, त्यामुळे काेरडेपणा, खाज आणि त्वचेची जळजळ हाेण्याचा धाेका कमी हाेताे काॅटन बड्स किंवा इतर टाेकदार वस्तूंनी कान साफ करताना मळ बाहेर येण्याऐवजी अधिक आत ढकलला जाऊ शकताे. त्यामुळे कानात मळ साचणे, कानदुखी, ऐकू कमी येणे, कानात सतत आवाज येणे (टिनिटस), चक्कर येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये कानाच्या पडद्यालाही इजा हाेण्याची शक्यता असते.
कानातील मळ केवळ ताे ऐकण्यावर परिणाम करत असेल, कान भरल्यासारखे वाटत असेल, वेदना हाेत असतील, सतत कानात आवाज येत असेल किंवा डाॅक्टरांनी त्याची गरज सांगितली असेल, तरच ताे काढण्याची आवश्यकता असते. अन्यथा, कान स्वतः ची स्वच्छता नैसर्गिकरीत्या करत असताे.
लक्षात ठेवा, कानातील मळ ही घाण नसून कानाच्या आराेग्याचे नैसर्गिक संरक्षण करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वारंवार कान साफ करण्याची सवय टाळा आणि गरज असल्यासच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कान स्वच्छ करून घ्या.