सध्या आपली जीवनशैली अशी झाली आहे की काम स्मार्ट झाले आहे आणि शरीराची हालचाल मात्र कमी झाली आहे. आयटी सेक्टर असाे किंवा बँकिंग, 8 ते 10 तास खुर्चीला खिळून राहणे हे आता न्यू नाॅर्मल झाले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हे हळूहळू रक्तवाहिन्यांचे नुकसान करत आहे? दीर्घकाळ एका जागी बसून राहणे हे स्लाे पाॅयझनसारखे आहे, जे रक्तवाहिन्यांचे आतून नुकसान करते. या समस्येशी संबंधित जाेखीम आणि उपायांबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
फिजिओथेरपिस्ट मानसी ठक्कर दीर्घकाळ खुर्चीवर बसून राहण्यामुळे हाेणाऱ्या परिणामांबद्दल सांगतात, आपले हृदय संपूर्ण शरीरात रक्त पंप करते, परंतु पायातून रक्ताला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पुन्हा हृदयापर्यंत पाेहाेचवण्याचे काम आपल्या पाेटऱ्यांचे स्नायू म्हणजेच काफ मसल्स करतात. वैद्यकीय भाषेत याला सेकंड हार्ट (दुसरे हृदय) म्हणतात. जेव्हा तुम्ही तासनतास खुर्चीवर स्थिर बसून राहता, तेव्हा हे दुसरे हृदय काम करणे बंद करते. परिणामी, रक्त वर जाण्याऐवजी पायांच्या नसांमध्ये साचून राहते. रक्तभिसरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण हाेताे, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील नाजूक थरावर दबाव वाढताे.
रक्तवाहिन्या निकामी हाेण्याची ही प्रक्रिया अत्यंत शांत असते. सामान्यतः लाेक याला कामाचा थकवा समजून दुर्लक्ष करतात. मात्र, याची लक्षणे सायलेंट डॅमेज करतात. त्यामुळे सुरुवातीचे संकेत ओळखायला शिकले पाहिजे. अचानक पाय मुरगळणे किंवा स्नायूंमध्ये पेटके येणे, पायात मुंग्या येणे, गुडघ्याच्या खाली सूज येणे, दिवस संपल्यावर पाय जड वाटणे, रात्री झाेपताना स्नायू आखडणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
हीच समस्या हळूहळू बळावते आणि भविष्यात रक्त गाेठणे आणि व्हेरिकाेज वेइन्स सारख्या गंभीर समस्या निर्माण हाेतात! हाय रिस्क झाेनमध्ये काेण आहे? वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खुर्च्यांचे प्रकारही वेगळे असतात. बँकेत जाल तर वेगळी खुर्ची दिसेल, काॅर्पाेरेट्समध्ये वेगळी असते आणि सरकारी ऑफिसमध्येही वेगळी असते. याबद्दल मानसी म्हणतात,- प्रत्येक खुर्चीचा आराम (कम्फर्ट) वेगळा असताे. पण जर सलग बसून राहणे असेल, तर खुर्ची कितीही आरामदायी असली तरी रक्तभिसरणात अडथळा येईलच. आयटी, बँकिंग आणि गेमिंग क्षेत्राशी संबंधित तरुण सध्या याचे बळी ठरत आहेत. स्क्रीन-टाइम वाढल्यामुळे 25 ते 30 वर्षांच्या तरुणांमध्ये रक्तभिसरणाच्या समस्या वाढल्या आहेत. अनेकदा लाेक चुकीच्या स्थितीत किंवा पायावर पाय टाकून तासनतास बसतात, ज्यामुळे नसांवर थेट दाब येताे. यामुळे कमी वयातच पायात सूज आणि क्राॅनिक पेन (जुनाट वेदना) सुरू हाेतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लाेकांच्या नसा आधीच नाजूक असतात, बैठी जीवनशैली या स्थितीला गंभीर बनवते! धाेका कमी करण्यासाठी हे करा डेस्क-जाॅब साेडणे शक्य नाही, पण अशा जीवनशैलीमुळे हाेणाऱ्या समस्या काही रुटीन बदलांनी दूर करणे शक्य आहे, असे सांगताना मानसी म्हणतात, - तुम्ही खुर्चीवर बसूनच काही व्यायाम करू शकता. दर पाऊण तासाने अलार्म सेट करा. उभे राहा, फक्त 100 पावले चाला किंवा स्ट्रेचिंग करा. हे तुमच्या रक्तप्रवाहाचा वेग पुन्हा वाढवेल (रीबूट करेल). याव्यतिरिक्त, घाेटा (अँकल) फिरवा, बसलेले असताना टाच वर करा आणि नंतर पंजे वर करा. याला हील-टाे रेझ व्यायाम म्हणतात. खुर्चीवर बसूनच पाय सरळ करा आणि पंजे स्वतःच्या दिशेने खेचा. अशा व्यायामाला सीटेड एक्सटेंशन म्हणतात. यामुळे तुमच्या पाेटऱ्यांचे स्नायू सक्रिय हाेतात आणि रक्त हृदयाच्या दिशेने पंप करतात, त्यामुळे रक्तभिसरणाच्या प्रक्रियेत अडथळा येत नाही. याव्यतिरिक्त तुमचे लक्ष हायड्रेशनवर (पाण्यावर) असले पाहिजे. जर शरीरात पाणी कमी असेल, तर रक्त घट्ट हाेते. जेव्हा तुम्ही हालचाल न करता बसून राहता, तेव्हा घट्ट रक्ताला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच पायाकडून हृदयाकडे वाहताना जास्त मेहनत घ्यावी लागते. पुरेसे पाणी रक्त पातळ ठेवते, जेणेकरून ते रक्तवाहिन्यांतून सहज वाहू शकेल. त्यामुळे हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे!