पुणे, 21 जुलै (आ.प्र.) : महावितरणतर्फे राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर माेहिमेला पुणे शहरात आणि परिसरात ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी विविध साेसायट्यांत जाऊन थेट मेळावे घेत आहेत. या जनजागृतीमुळे पुणे परिमंडलात एकूण 14 लाख 13 हजार 193 स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
स्मार्ट मीटरच्या जनजागृतीसाठी मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी मंडलनिहाय पूर्णवेळ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात दाेन अभियंत्यांसह 5 जणांचा समावेश असून, ही पथके माेठमाेठ्या साेसायट्यांमध्ये जाऊन तेथील सभासंदांना एकत्र करून स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचा गैरसमज दूर करत आहेत. एका आठवड्यात या पथकांनी सुमारे 200 ठिकाणी मेळावे घेऊन 40 हजारांहून अधिक वीज ग्राहकांची जनजागृती केली आहे; तसेच दाेन चित्ररथही गर्दीच्या ठिकाणी स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करत आहेत.
पुणे परिमंडलात एकूण 39 लाख वीजमीटर आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात 5 लाख 28 हजार 326, रास्ता पेठ शहर मंडलात 5 लाख 24 हजार 222 आणि पुणे ग्रामीण मंडलात 3 लाख 60 हजार 645 स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या साेयीसाठी आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. साेशल मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे. आपल्या साेसायटीत कर्मचाऱ्यांची पथके आल्यास त्यांच्याकडून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.