अविवाहित मुले भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्याचे टाळतात

    22-Jul-2026
Total Views |
 
Jagannath Puri
भुवनेश्वर, 21 जुलै (वि.प्र.) : ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिर हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखाे भाविक इथल्या रथयात्रेत सहभागी हाेतात. जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक लाेकश्रद्धा आहेत, ज्या शतकानुशतके प्रचलित आहेत.
 
यापैकी एक अतिशय मनाेरंजक आणि आश्चर्यकारक श्रद्धा अशी आहे की अविवाहित जाेडप्यांनी मंदिरात एकत्र भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाऊ नये. भगवान जगन्नाथ पुरी मंदिराशी संबंधित लाेककथेनुसार, अविवाहित जाेडप्यांनी मंदिराच्या गर्भगृहात एकत्र जाऊ नये. अशी श्रद्धा आहे की, जर एखादे अविवाहित जाेडपे भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी एकत्र गेले, तर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण हाेऊ शकताे किंवा त्यांच्या विवाहात अडथळे येऊ शकतात.
 
ही श्रद्धा स्थानिक लाेकांमध्ये पिढ्यानपिढ्या प्रचलित आहे.
 
त्यामुळे, अनेक अविवाहित जाेडपी आजही या परंपरेचा आदर करतात आणि स्वतंत्रपणे मंदिरात जाणे पसंत करतात. मात्र खरं पाहायला गेलं तर असा काेणताही नियम किंवा बंदी जगन्नाथ मंदिराच्या अधिकृत परंपरेत किंवा हिंदू धर्मग्रंथांमध्ये नाही.
 
पाैराणिक कथेनुसार, एकदा राधा राणी भगवान श्रीकृष्णांच्या (जगन्नाथांचे रूप) दर्शनासाठी पुरीला आल्या हाेत्या. मंदिरात उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांनी त्यांना आत जाण्यापासून राेखले आणि सांगितले की, मंदिरात फक्त भगवान आणि त्यांच्या पत्नींनाच प्रवेश दिला जाताे.
 
हे ऐकून राधा राणीला खूप दुःख झाले आणि त्यांनी शाप दिला की, जे काेणतेही अविवाहित जाेडपे एकत्र मंदिरात दर्शन करतील, त्यांचे कधीही कल्याण हाेणार नाही. या शापामुळे, स्थानिक लाेक आणि भक्त आजही ही परंपरा पाळतात.
 
खरं सांगायचं झालं तर, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने अविवाहित जाेडप्यांना एकत्र मंदिरात येण्यावर काेणतेही कायदेशीर किंवा अधिकृत निर्बंध घातलेले नाहीत. मंदिराच्या नियमांमध्ये अशी काेणतीही तरतूद नाही जी प्रेमी युगुलांना किंवा अविवाहित जाेडप्यांना एकत्र मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करते. ही पूर्णपणे भक्तांच्या श्रद्धेची आणि वैयक्तिक विश्वासाची बाब आहे.
जे या विश्वासावर ठाम आहेत ते त्याचे पालन करतात, तर अनेक भक्त केवळ एकत्र भेट देतात.