श्रीसमर्थांनी या समासाच्या 71 ओव्यांमध्ये मूर्खाची जी लक्षणे सांगितली आहेत ती जीवनाच्या सर्व क्षेत्रांत घडणाऱ्या चुकांची जणू सप्रमाण यादीच म्हणावी लागेल. यामध्ये कुटुंबातील वागणे, व्यापार व व्यवहारातील वर्तन, वक्तृत्व आणि श्राेतृत्व, जगाशी व्यवहार, शरीराचे आराेग्य, काम, क्राेध, माेह, मत्सर इत्यादी विकारांच्या आधीनतेचे वर्तन हे सर्व भाग समाविष्ट आहेत. इतकेच नव्हे तर पुस्तकाचे, ते नीट सांभाळण्याचे, कसे वाचावे याचेही मार्गदर्शन त्यांनी अक्षरे गाळून वाची । कां ते घालि पदरिचीं । निगा न करी पुस्तकाची । ताे येक मूर्ख ।।70।। आपण वाचीना कधी । काेणास वाचावया नेदी । बांधाेन ठेवी बंदी । ताे येक मूर्ख ।।71।। अशा शब्दात केले आहे. वाचन करताना अक्षरे गाळू नयेत किंवा पदरचीही घालू नयेत आणि ग्रंथाची नीट निगा ठेवावी. आपण वाचायचा नाही, दुसऱ्याला वाचावयास द्यावयाचा नाही आणि केवळ बांधून ठेवायचा असा ग्रंथसंग्राहक त्यांच्या दृष्टीने मूर्खच म्हणावा लागेल. आजकाल नवश्रीमंतांचे बंगले किंवा फ्लॅटमधील हाॅलमध्ये शाेभिवंत ‘बुक केस’ असते आणि त्यात रामायण महाभारतापासून पु. ल.
देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, कुसुमाग्रज अशांचे ग्रंथ देखणेपणाने ठेवलेले असतात.