मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा : मुख्यमंत्री फडणवीस

    22-Jul-2026
Total Views |

-marathi-language-preservation 
मराठी भाषा, साहित्य आणि बाेलींच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता येण्यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद माेरे, भाषा संचालक अरुण गीते; तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष व ऑनलाइन बैठकीस उपस्थित हाेते.
 
राज्य मराठी विकास संस्थेची सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बाेलींच्या संवर्धनासाठी अनेक सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तंजावर येथील माेडी लिपीतील सुमारे 15 लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला; तसेच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.