प्रत्येक नागरिकापर्यंत याेजना पाेहाेचवणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    20-Jul-2026
Total Views |

msedcl-punishes-over 
 
गडचिराेली, 19 जुलै (आ.प्र.) : गडचिराेलीत नक्षलवादाचा प्रभाव माेठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर आता विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, शासनाच्या सर्व याेजना आणि सेवा दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पाेहाेचवणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
प्रशासनाचा लाेकाभिमुख चेहरा नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता आला पाहिजे आणि शासनाच्या सेवांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत पाेहाेचला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
गडचिराेली जिल्ह्यातील अतिदुर्गम व पूर्वी नक्षलप्रभावित असलेल्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचे लाेकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. मुंबईतून मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तर गडचिराेलीतून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा पाेलीस अधीक्षक एम. रमेश कार्यक्रमाला उपस्थित हाेते. याशिवाय विविध मिनी सेतू केंद्रांचे चालक, स्थानिक लाेकप्रतिनिधी आणि अधिकारीही ऑनलाइन सहभागी झाले हाेते.
 
भामरागड येथील मिनी सेतू केंद्राशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी इंटरनेट सुविधा आणि सेवा वितरणाची माहिती घेतली. रहिवासी, उत्पन्न, जात व जन्म दाखल्यांसह आधार सेवा आणि विविध शासकीय सेवा नियमितपणे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती केंद्र चालकाने दिली. आरेवाडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी गावात मिनी सेतू केंद्र सुरू झाल्यानंतर नागरिकांना विविध दाखले गावातच मिळू लागल्याने तालुका मुख्यालयापर्यंतची पायपीट वाचत असल्याचे सांगितले.
 
पूर्वी नक्षलप्रभावित भागात महसूल आणि इतर शासकीय यंत्रणांना पाेहाेचणे कठीण हाेते. अशा स्थितीत पाेलीस दादालाेरा खिडकी उपक्रमाने नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा पाेहाेचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याच संकल्पनेचा विस्तार करत आता 9 आदी सेवा केंद्रे आणि 13 पाेलीस दादालाेरा खिडकी केंद्रांचे मिनी सेतू केंद्रांत रूपांतर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.