दासबाेधाच्या दुसऱ्या दशकाची सुरुवात श्रीसमर्थ ‘मूर्खलक्षणनाम’ समासाने करीत आहेत.
पहिल्या दशकातील एकूण 10 समासांमध्ये ग्रंथारंभ करून श्रीगणेश, सदगुरू, संत, श्राेते आणि सभा यांना वंदन करून त्यांनी परमार्थमार्गाची आवश्यकता आणि त्यासाठी आवश्यक असणारा दुर्लभ असलेला नरदेह मिळाल्याचे महत्त्व वर्णन केले आहे. आता या दुसऱ्या शतकात श्रीसमर्थ परमार्थ मार्गाची पूर्वतयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करीत आहेत.
आपणाला एखादी लांब उडी मारावयाची असेल, तर आधी स्टार्ट घ्यावा लागताे. तसे प्रपंच आणि परमार्थ याचा श्रीसमर्थांचा ‘दासबाेध’ सामान्यांच्या पचनी पडावा, अंतरात भरावा आणि पुढे आचरणात यावा, यासाठी या दशकांत समर्थांनी मनुष्यस्वभावाची विविध लक्षणे व गुणधर्म सांगितले आहेत. त्यामध्ये काही दाेष, मूर्खपणा, पढत्मूर्खपणा, कुविद्या वगैरे साेडण्यासाठी, तर उत्तम लक्षण वगैरे अंगी बाणण्यासाठी आहेत.
त्यातील पहिल्या समासाचे नावच मुळी मूर्खलक्षण आहे. अर्थात ही लक्षणे जाणून ती साेडण्याचा, ते दाेष टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा हेच त्यांचे कळकळीचे सांगणे आहे.