शून्य कचऱ्यामुळे केरळच्या छाेट्या शहराला नव्याने ओळख मिळाल

    18-Jul-2026
Total Views |
 
varkala-kerala-becomes-indias-only
 
तिरुअनंतपूरम, 17 जुलै (वि.प्र.) : केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला हे एक किनारी आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर आहे.
ते आपल्या अतुलनीय साैंदर्यासाठी, अरबी समुद्रासाठी, उंच कड्यांसाठी, 2000 वर्षे जुन्या जनार्दन स्वामी मंदिरासाठी आणि मशिदींसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या सुंदर शहराला आता जगभरात शून्य-कचरा शहर म्हणून एक नवी ओळख मिळत आहे.
 
हॅबिटॅट आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने जगभरातील 20 शहरी भागांमधून वर्कला नगरपालिकेची शून्य कचरा शहर म्हणून निवड केली आहे. या 20 शहरांमध्ये वर्कला हे एकमेव भारतीय शहर आहे.
 
40,000 लाेकसंख्या असलेले वर्कला पाच वर्षांपूर्वी इतर काेणत्याही भारतीय शहरांसारख्याच परिस्थितीत हाेते. 2020 मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी महिलांच्या हरित कर्म सेनेच्या 262 सदस्यांना तैनात करण्यात आले. या पथकांनी घराेघरी जाऊन कचरा गाेळा केला, लाेकांमध्ये जनजागृती केली आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले.
 
यामुळे 12,695 घरे आणि 2,601 संस्थांमधून घराेघरी कचरा गाेळा केला गेला.
 
हळूहळू लाेकांच्या सवयी बदलल्या. आता प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा 100% पूर्णपणे वेगळा केला जाताे. नगरपालिकेने एक अद्वितीय 5-टन क्षमतेचा सॅनिटरी वेस्ट प्लांट सुरू केला आहे.
 
ताे सॅनिटरी आणि बायाेमेडिकल कचऱ्याचे विजेमध्ये रूपांतर करताे. हा प्लांट 60 किलाेवॅट वीज निर्माण करताे. वर्कलामध्ये दरवर्षी अंदाजे 6,000 टन कचरा निर्माण हाेताे. त्यापैकी 81% सेंद्रिय आणि सुमारे 95% असेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.