सकाळी लवकर उठावें। भगवंताचे स्मरण करावें। हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ।। हृदयांत ठेवावें रामाचें ठाण। षोडशोपचारें करावें पूजन। गंधफूल करावें अर्पण। नैवेद्य करावा अर्पण। मनानें प्रसाद घ्यावा जाण ।। शेवटीं करावी प्रार्थना एक। रामा, तुला मी शरण देख ।। जें जें म्हटलें मी माझें। तें तें रामा तुझें ।। आतां न गुंतवा माझें मन। रामा, मी आलो तुला शरण ।। वासना न उठो दुजी कांहीं। नामामध्यें प्रेम भरपूर देई ।। सदा राखावें समाधान। जें तुझे कृपेवाचून नाहीं जाण ।। नीतिधर्माचें आचरण। तुझे कृपेनें व्हावें जतन ।। आतां द्या नामाचें अखंड स्मरण। देह केला तुला अर्पण ।। रामा, जें जें कांहीं तूंकरी। त्यांत समाधानाला द्यावें पुरी ।। आतां रामा, एकच करी। तुझा विसर न पडो अंतरीं ।। तुझे नामाची आवडी। याहून दुजें मागणें नसावें उरीं। हेंचि द्यावें मला दान। दीन आलों तुज शरण ।। रामा, मला एकच द्यावें। तुझें अनुसंधान टिकावें ।। नको नको ब्रह्मज्ञान। काव्यशाखव्युत्पत्तीचे ज्ञान ।। काम-क्रोधाचे विकार। जाळिताती वारंवार ।। आता तारी अथवा मारी। तुझी कास कधीं न सोडी ।।सदाचरण है सुखाचें मुख्य साधन। त्यांत भगवंताचें करावें स्मरण। जेणें लाभेल खरें समाधान ।। कर्तव्यांत राहावें आपण। फलाची अपेक्षा न ठेवतां जाण। कारण, प्रयत्न करणें आपले हातीं। यश देणें भगवंतापाशीं ।।? ‘मी पडलों तुझ्या दारीं। आतां रामा, तुझा झालों। कत पणांतून मुक्त झालों ।। माझे सर्व तें तुझें पाहीं ।। माझें मीपण हिरोन जाई ।। रामा, आतां एकचि करी। वृत्ति सदा राहो तुझेवरी ।। रामा, मी कोठें जावें?। तुजवांचून कोठें राहावें ? ।। देहबुद्धीची नड फार। ती करावी रामा तुम्हीं दूर ।। आजवर विषय केला आपलासा। न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ।। रामा, सर्व सत्ता तुझ्या हातीं। समाधान राहील अशी करावी वृत्ती ।। तुमचेजवळ मागणें दुजें नाहीं। हृदयांत तुझा वास अखंड राही ।। आतां तुझ्यासाठी माझे जीवन । तुला तन-मन केलें अर्पण ।। तुमचे चिंतनीं लागावें मन। कृपा करा रघुनंदन‘।। ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ।। ऐसें व्हावें अनन्य दीन। तात्काळ भेटेल रघुनंदन ।। ऐसी रामास मारा हांक। तो दूर नाहीं नाहीं खास ।। नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण। मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ।। नामाच्या संगतीं। ज्या व्यवहाराची प्राप्ती। तोच व्यवहार जाई भगवत्सेवेप्रती ।। ज्ञान, विवेक, विरक्ती, नामस्मरणें सर्वांची प्राप्ती ।। नामाविण दुजें कांहीं। सत्य सत्य त्रिवाचा नाहीं ।।