मरणसमयी परमात्मा आपली काळजी कशी घेताे हे वरील ओवीत स्पष्ट झाले आहे. पण या काळी भगवंताचे स्मरण कसे हाेणार या अर्जुनाच्या शंकेस भगवंत आधी उत्तर देतात. सर्व विषयसुखांवर पाणी साेडून हृदयात मला एकट्यालाच साठवावे व माझे सुख भाेगावे.
त्यावेळी क्षुधातृषेची आठवण हाेणार नाही.
मग भिकारड्या इंद्रियविषयांची भीती कशाला? अखंड मत्परायण व्हावे. मद्रूप हाेऊन माझी भक्ती करावी. अशी भक्तांनी मरणकाळी माझे स्मरण करावे व मी त्यांना मदत करावी. यात नवल ते काय? एखाद्या भिकाऱ्याने ‘भगवंता, धाव’ अशी याचना केली की, मी त्याचे रक्षण करीत नाही काय? त्याचप्रमाणे माझ्या प्रेमळ भक्ताने माझा धावा करावा व मग मी त्याचे रक्षण करावे असे असेल तर त्या माझ्या रक्षणाला काय किंमत? अशा विकल्पाला अर्जुना, तू मनात थारा देऊ नकाेस. भक्ताने धावा करावा व मग मी धावून जावे हे देखील मला सहन हाेत नाही. तर भक्ताच्या निष्काम प्रेमाचे एवढे ॠण माझ्यावर असते की, ते थाेडेतरी ेडण्यासाठी मरणसमयी मी त्याचीच सेवा करण्यास उत्सुक हाेताे. देह साेडण्याच्या वेळी जीवाला विकलता प्राप्त हाेईल अशा शंकेने मी माझ्या भक्ताला अगाेदरच आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात घालून ठेवताे. माझ्या सगुण प्रेमाची शीतल छाया त्याच्यावर पसरताे. अशा रीतीने मी त्याला माझे स्मरण करण्याचीही आवश्यकता उरवू देत नाही.
म्हणून मरणाच्या वेळी माझ्या भक्ताला कधीच संकट पडत नाही. त्याला मी माझ्याकडे सुखाने आणताे. त्याच्या देहाची खाेळ बाजूला सारताे.
अहंकाराची धूळ झाडताे. त्याची वासना शुद्ध करताे आणि त्याला माझ्यात सामावून घेताे. त्याला देहाचा अभिमान नसल्यामुळे ताे साेडताना त्याला कसलेही वियाेगाचे दु:ख हाेत नाही.