मुंबई, 12 जुलै (आ.प्र.) : राज्यातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई वाॅटर मेट्राे प्रकल्पासाठी वाॅटर मेट्राे व्हेसल्स उपलब्ध करून देणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि झाेया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, झाेया मरीन सर्व्हिसेसचे संचालक जाॅन फर्नांडिस, संचालक सूरज देवाढिया, तसेच अंबर आयंदे, डाॅ. नीलेश बानवलीकर आदी या वेळी उपस्थित हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सागरी क्षेत्रात माेठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई वाॅटर मेट्राे प्रकल्पासाठी अत्याधुनिक वाॅटर मेट्राे उपलब्ध करून देण्याबराेबरच सिंधुदुर्गात इलेक्ट्रिक बाेट निर्मितीचा उद्याेग उभारल्यामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. त्यामुळे स्थानिक युवकांसाठी राेजगाराच्या संधी निर्माण हाेतील आणि आधुनिक जहाजबांधणीला चालना मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तालवणे येथे 22 एकर जागेवर सुमारे 150 काेटींच्या गुंतवणुकीत इलेक्ट्रिक बाेट निर्मितीचा अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासाेबतच जहाजबांधणी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. या बैठकीत दाेन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आराखडा, गुंतवणूक, तांत्रिक सहकार्य, स्थानिक काैशल्य विकास, राेजगारनिर्मिती, तसेच भविष्यातील सागरी उद्याेगवृद्धीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.