मुसळधार पावसामुळे डेक्कन क्वीनसह अनेक रेल्वे 17 जुलैपर्यंत रद्द

    13-Jul-2026
Total Views |
 
CentralRailway
पुणे, 12 जुलै (आ.प्र.) : मुसळधार पावसामुळे लाेणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर झालेल्या भूस्खलनाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेने 17 जुलैपर्यंत अनेक महत्त्वाच्या गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेससह पुणे, मुंबई आणि इतर राज्यांना जाेडणाऱ्या अनेक मेलएक्स्प्रेस गाड्यांचा यात समावेश आहे.
 
मुसळधार पावसामुळे 6 जुलैस लाेणावळा-कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे रेल्वे रुळ, विद्युत यंत्रणा आणि अन्य पायाभूत सुविधांचे माेठे नुकसान झाले आहे. तिन्ही रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असले, तरी नुकसानीचे स्वरूप माेठे असल्याने दुरुस्तीला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अचानक रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत हाेता. ही गैरसाेय कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना प्रवासाचे नियाेजन करता यावे, म्हणून मध्य रेल्वेने 17 जुलैपर्यंतच्या रद्द हाेणाऱ्या गाड्यांची यादी जाहीर केली आहे. या निर्णयानुसार 17 जुलैपर्यंत राेज धावणाऱ्या 14 गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. यात डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी, मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेस, मुंबई- चेन्नई सुपरफास्ट मेल, दाैंड-इंदूर एक्स्प्रेस, तसेच हुबळीदादर एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय, महालक्ष्मी एक्स्प्रेस, दादर-सातारा एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, जाेधपूर- हडपसर एक्स्प्रेस आदी गाड्याही विविध तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातून गाेरखपूर, गाझीपूर सिटी आणि हजरत निजामुद्दीनकडे धावणाऱ्या विशेष गाड्याही रद्द करण्यात आल्याने उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही फटका बसणार आहे.
 
मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी अहाेरात्र काम करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.