संध्यानंद.काॅम
यावर्षी बंगळुरूसह भारतातील टेक क्षेत्रातील 35,000 नाेकऱ्यांवर ‘सायलेंट ले-ऑफ’ची टांगती तलवार आहे. एआयच्या वाढत्या वापरामुळे कंपन्यांमधील नवीन भरती कमी झाली आहे. साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि टेक सपाेर्ट यांसारखी कामे एआय साधनांद्वारे केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी हाेत आहे. टिकून राहण्यासाठी काैशल्यवृद्धी (अपस्किलिंग) अपरिहार्य आहे.
जगभरातील टेक क्षेत्रात आता एआयच्या वाढत्या वापराचा परिणाम दिसून येत आहे. 2026 या वर्षांत आतापर्यंत जगभरातील टेक क्षेत्रात 1.20 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नाेकरी गेली आहे.
आता याचा थेट परिणाम भारतावर दिसून येत आहे. एका अंदाजानुसार, यावर्षी भारतातील टेक क्षेत्रात सुमारे 35 हजार नाेकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
(पान 14 पाहा) यावेळची कर्मचारी कपात ही मागील वर्षांप्रमाणे केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, एआयमुळे कंपन्यांच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांचा परिणाम आहे.
साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्वालिटी टेस्टिंग, टेक सपाेर्ट आणि नियमित काेडिंग यांसारखी अनेक कामे आता एआय साधनांच्या मदतीने अधिक वेगाने केली जात आहेत. यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घाेषणा केलेली नाही. परंतु, गुपचूप कर्मचारी कपातीचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये, काेणतीही माेठी घाेषणा न करता कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाेकरीवरून काढून टाकले जात आहे किंवा नवीन भरती थांबवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आयटी क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकणे, एआय काैशल्ये विकसित करणे आणि सतत काैशल्यवृद्धी करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.