संध्यानंद.काॅम प्रत्यक्ष कामकाजाच्या परिस्थितीत केलेल्या एका अभ्यासानुसार दीर्घकाळ एका जागी बसून राहण्यामुळे आराेग्यास हाेणारे हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी दर तासाला पाच मिनिटांचा चालण्याचा ब्रेक घेणे, हा व्यवहार्यता आणि परिणामकारकता यांचा समताेल साधणारा उपाय ठरताे.
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पाेर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार या अल्पकाळाच्या विश्रांतीमुळे (ब्रेकमुळे) मनः स्थिती सुधारणे आणि थकवा कमी हाेणे असे फायदे मिळतात. तसेच, यामुळे कामाच्या कामगिरीवर काेणताही विपरित परिणाम हाेत नाही. त्यामुळे सार्वजनिक आराेग्य धाेरण आणि शारीरिक हालचालींविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या उपायांचा समावेश केला जाऊ शकताे, असेही हे निष्कर्ष सुचवतात.
दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे ही सार्वजनिक आराेग्याची एक गंभीर समस्या बनली आहे. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार यांसारखे आजार व इतर दीर्घकालीन व्याधींचा धाेका वाढताे. तसेच, यात अकाली मृत्यूचाही धाेका असू शकताे.
अमेरिकेतील काेलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील संशाेधकांसह इतर संशाेधकांनी असे म्हटले आहे की, दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्यामुळे हाेणारे नुकसान भरून काढण्यासाठी सार्वजनिक आराेग्य उपाय म्हणून अधूनमधून नियमितपणे हालचाल करण्याचे सुचवले गेले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात हा उपाय कितपत अमलात आणण्याजाेगा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेच्या नॅशनल पब्लिक रेडिओने आयाेजित केलेल्या बाॅडी इलेक्ट्रिक चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या 19,300 हून अधिक प्राैढांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले, त्यातून हा निष्कर्ष समाेर आला आहे.
विविध वयाेगट, व्यवसाय आणि कामाची ठिकाणे असलेल्या एकूण सहभागींपैकी जवळपास 60% (म्हणजेच 11,484) लाेकांनी आपल्या नेहमीच्या दिनचर्येचे सात दिवस पूर्ण केल्यानंतर सलग 14 दिवस चालण्याचा 5 मिनिटांचा ब्रेक घेतला. यासाठी त्यांनी 30, 60 किंवा 120 मिनिटांपैकी स्वतःच्या पसंतीचे अंतराल (फ्रिक्वेन्सी) निवडले हाेते. हे निष्कर्ष मूव्हमेंट ब्रेक्सला (हालचालींसाठीचे छाेटे विरंगुळे) दीर्घकाळ एका जागी बसून राहण्यामुळे हाेणारे नुकसान कमी करण्यासाठीची एक व्यवहार्य सार्वजनिक आराेग्य उपाययाेजना म्हणून पुष्टी देतात.