धन्य धन्य हा नरदेहाे । येथील अपूर्वता पाहाे ।।1।।

    13-Jul-2026
Total Views |
 

saint 
परमार्थमार्गाचा प्रवास करताना अनेक संतांनी नरदेहासंबंधी तिटकारा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या समासाचे नावच मुळी श्रीसमर्थांनी ‘नरदेहस्तवन’ असे देऊन त्यात नरदेहाचे म्हणजेच मनुष्यजन्माचे आणि त्यायाेगे प्राप्त हाेणाऱ्या मानवी शरीराचे गुणवर्णन केले असून त्याला वंदनही केले आहे. वरवर पाहणाऱ्याला हा विराेधाभास वाटेल पण वस्तुस्थिती तशी नाही हे आपण लक्षात घ्यावे.
 
संतांनी देहाला जी नावे ठेवलेली आहेत ती शरीराला नसून त्यात निर्माण हाेणाऱ्या विकारांच्या आधीन जाणाऱ्या विकारविवशतेला ठेवलेली आहेत आणि येथे श्रीसमर्थ म्हणतात की चाैऱ्याएेंशी लक्ष याेनींच्या प्रवासानंतर मनुष्यजन्म प्राप्त हाेताे आणि ताे प्राप्त हाेणे हीसुद्धा भाग्याची गाेष्ट आहे.
 
मनुष्य आणि इतर पशू, पक्षी, प्राणी यांच्यात जाे माेठा फरक आहे ताे बुद्धिमत्तेचा! माणसाला असणारी बुद्धी इतरांना नाही. त्या बुद्धीची सुबुद्धी करावयाची का दुर्बुध्दी, हे माणसाच्या हातात आहे. परंतु जर मनुष्यदेहच नसेल तर बुद्धीच नाही, तेव्हा सद्बुद्धी तरी काेठून येणार? भक्ती व साधना काेठून व कशी हाेणार? आणि परब्रह्मप्राप्तीचा मग विचारच नकाे! म्हणून नरदेह प्राप्त झाला हीच पूर्वजन्मीचे पुण्य फळाला आल्याची खूण आहे.