ज्येष्ठांच्या तीर्थदर्शन यात्रा इच्छापूर्तीचा आनंद

    13-Jul-2026
Total Views |

TirthDarshanYojana 
 
नागपूर, 12 जुलै (वि.प्र.) : भगवान गाैतम बुद्धांच्या विचाराचे प्रेरणास्त्राेत म्हणून आपण बाेधगया येथे जाताे. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांना असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन याेजना सुरू केली. नागपूर येथून या याेजनेंतर्गत या वर्षी सुमारे 800 भाविकांना जाता येत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
नागपूर रेल्वे स्थानकातून बाेधगयेकडे जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी आयाेजिण्यात आलेल्या विशेष समारंभात मुख्यमंत्री बाेलत हाेते. या वेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, वित्त व नियाेजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, महापाैर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री कृष्णा खाेपडे, संजय मेश्राम, समीर मेघे, चरणसिंह ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ.हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगाेटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. भाविकांच्या इच्छापूर्तीचा आनंद ही याेजना यशस्वी झाल्याची पावती आहे. या यात्रेत काेणत्याही वृद्ध भाविकांची गैरसाेय हाेऊ नये, या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाने काळजी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून आपण लवकरच बाेधगयेत महाराष्ट्रातील भाविकांसाठी माेठे संकुल निर्माण करीत असल्याची माहिती देऊन शिरसाट यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. बाेधगयेस जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री, शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या वेळी सर्व मान्यवरांनी भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.