डिजिटल पेमेंटमुळे महागाईचे चटके जाणवेना

महागाई प्रचंड वाढली, उत्पन्न मर्यादित आहे; तरी बाजारातील गर्दी वाढतच आहे

    13-Jul-2026
Total Views |

digital payment1
 
 
संध्यानंद.काॅम
अनावश्यक खर्च कमी करा, पेट्राेलचा वापर मर्यादित ठेवा, साेने खरेदी, वैभवी प्रवास, अनावश्यक शाॅपिंगपासून दूर राहा, काटकसरीने जगा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदींनी केले. परंतु, माॅल, मल्टिप्लेक्स, रेस्टाॅरंटबाहेर अगदी वेगळेच चित्र दिसेल. रेस्टाॅरंटबाहेर वेटिंग लिस्ट आहे, बाजारात गर्दी आहे, माॅल्समध्ये ब्रँडेड वस्तूंच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एअरपाेर्टही आता बस स्थानकासारखे वाटू लागले आहे. कारने सपरिवार लांबच्या प्रवासाला जाणे ही आता फॅशन बनली आहे.
 
इतके पैसे येतात कुठून, हा प्रश्न
महागाई प्रचंड आहे, उत्पन्न मर्यादित आहे, तरी बाजारात इतकी प्रचंड गर्दी येते कुठून? नागरिक इतके पैसे कुठून आणत आहेत? या विसंगतीमागे काही जादू नाही, तर आर्थिक व्यवहार पद्धतीत झालेले बदल व त्यामागील मानसशास्त्र आहे. सध्या आपल्या खिशातील पैशाच्या पाकिटाची जागा स्मार्टफाेनने घेतली आहे.
 
डिजिटल स्क्रीनमुळे संपली पैसे देतानाची धडधड युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय), डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या आगमनामुळे देशात खरेदीची व्याख्याच बदलली. राेख रुपये माेजताना हृदयात जी धडधड, संकाेच व्हायचा, ताे आता डिजिटल स्क्रीनवर फक्त एका क्लिकने किंवा स्कॅनने गायब झाला आहे.
 
पाकीट रिकामे हाेताना पाहणे वेदनादायी
अर्थशास्त्र आणि वर्तणूक मानसशास्त्रामध्ये एक अतिशय प्रसिद्ध सिद्धान्त आहे, ज्याला ‘पेन ऑफ पेयिंग’ म्हणजे पैसे देण्याचे दुःख असे म्हटले जाते.
व्यक्ती पाकिटातून रुपयांच्या नाेटा बाहेर काढते, माेजते, व्यापाऱ्याच्या हातात देते, तेव्हा तिच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारचा मानसिक आघात म्हणजे शाॅक बसताे. तिला या गाेष्टीची त्वरित जाणीव हाेते की, तिची कष्टाची कमाई तिच्यापासून दूर जात आहे. पाकीट रिकामे हाेताना पाहणे, हे डाेळ्यांसाठी, मेंदूसाठी एक अपराधीपणाची भावना, वेदना निर्माण करते.
 
नुकसानीच्या भावनेमुळे जीव कासावीस
नाेबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर आणि डॅनियल काहनेमन यांनी त्यांच्या संशाेधनात सिद्ध केले आहे की, मनुष्य नफा मिळवण्यापेक्षा नुकसानीला जास्त घाबरताे. राेख रक्कम देणे हे तात्काळ आणि प्रत्यक्ष नुकसान वाटते, त्यामुळे जीव कासावीस हाेताे.
 
डिजिटल पेमेंटमध्ये भावनिक तणाव नसताे
पैसे देताना हाेणाऱ्या भावनांची प्रक्रियाच डिजिटल पेमेंटमध्ये गायब हाेते. यूपीआय स्कॅनमधून पैसे देताना फाेनने क्यूआर काेड स्कॅन करून, पिन टाकला की गाेष्ट संपते! हाताने काेणतीही भाैतिक वस्तू गेली नाही.
 
स्क्रीनवर फक्त आकडे बदलले आहेत. क्रेडिट कार्डमध्येही आज खरेदी करा, नंतर पैसे भरा हा हिशाेब असताे. यामुळे खरेदीचा आनंद लगेच मिळून ऋण चुकवण्याची वेदना भविष्यावर ढकलली जाते. ऋणचुकवण्याची वेदना शून्य असताना माणूस क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्यास प्रवृत्त हाेताे. त्याला महागाई जाणवत नाही. कारण बँक खात्यातून डिजिटल नंबर्स कमी हाेण्याचा आघात मेंदूपर्यंत उशिरा पाेहाेचताे.
 
विक्रमी व्यवहार
नॅशनल पेमेंट्स काॅर्पाेरेशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात 2025-26 वर्षांत, दरमहा सरासरी 1500 काेटींपेक्षा जास्त यूपीआय व्यवहार हाेत आहेत. या व्यवहारांचे मासिक मूल्य सुमारे 20 ते 22 लाख काेटी रुपयांपर्यंत आहे. वार्षिक स्तरावर, भारताचे यूपीआय व्यवहार मूल्य देशाच्या एकूण जीडीपीच्या माेठ्या भागाइतके झाले आहे. चहाच्या टपरीपासून 50,000 रुपयांच्या इलेक्ट्राॅनिक्सपर्यंत सर्व काही यूपीआयमय झाले आहे.
 
डिजिटल पेमेंट बनले मायावी जग, त्यामुळे पाकिटातून खर्च हाेण्याची वेदनाच संपली
ऋणचुकवण्याची शून्य वेदना राेखीने खरेदी करताना पैशापैशासाठी ग्राहक घासाघीस करताे, पण ताेच ग्राहक मल्टिप्लेक्समध्ये पाॅपकाॅर्नचे 300 रुपये जाणिवा बंद करून स्कॅनरने देऊन टाकताे. कारण डिजिटल मनीमुळे पैसे देण्याची वेदना शून्य हाेते. माणूस क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्यास प्रवृत्त हाेताे. त्याला महागाई जाणवत नाही.कारण बँक खात्यातून डिजिटल नंबर्स कमी हाेण्याचा आघात मेंदूपर्यंत उशिरा पाेहाेचताे.